मांजरसुंबा जनावरांच्या छावणीचा हरिकीर्तन करून समारोप
माय नगर वेब टीम
अहमदनगर - दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या तीन, साडेतीन महिन्यांपासून नगर तालुक्यातील मांजरसुंबा येथे सुरु असलेल्या जनावरांच्या चारा छावणीचा हभप भाऊसाहेब अन्हाड महाराज यांच्या हरी कीर्तनाने समारोप करण्यात आला. अनेक दिवस एकत्र राहत असलेले शेतकरी छावणीतून जनावरे घरी नेताना भावूक झाले होते.
जिल्ह्यात पावसास सुरुवात झाली आहे. त्यामुळे चारा छावण्या बंद होत आहेत. काही छावण्या बंद होण्याच्या मार्गावर आहेत. काही भागात मात्र अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही. अशा ठिकाणच्या छावण्या सुरू ठेवणे गरजेचे आहे. सरकारचेही तसे धोरण आहे. मात्र जिल्हा प्रशासनाने छावणी चालकांना छावण्या बंद करण्याचे तोंडी आदेश दिल्याने नगर तालुक्यात अनेक छावण्या बंद झाल्या आहेत.मांजरसुंबा येथे नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने गेल्या तीन, साडेतीन महिन्यांपासून चारा छावणी चालविण्यात आली. प्रशासनाच्या आदेशानुसार छावणी बंद करताना या छावणीचा समारोप आगळ्या वेगळ्या पद्धतीने करण्यात आला. छावणीत हभप भाऊसाहेब अन्हाड महाराज यांचे हरी कीर्तन यावेळी आयोजित करण्यात आले होते.
या कीर्तनास आ. शिवाजीराव कर्डिले, अक्षय कर्डिले, सरपंच जालिंदर कदम यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.हभप अन्हाड महाराज यांनी यावेळी मुक्या जनावरांची सेवा केल्याने होत असलेले ईश्वरी लाभ याबाबत माहिती विषद केली. आ. कर्डिले म्हणाले, दुष्काळात शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करून छावण्यांना मंजुरी मिळवून दिली. प्रशासनाने लादलेल्या जाचक अटी कमी करण्यास भाग पाडले. ज्या ठिकाणी छावण्या सुरु करण्यासाठी कोणी पुढे आले नाही तेथे बाजार समिती व नगर तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने छावण्या सुरु करून शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्याचा प्रयत्न केला आहे.
सरपंच जालिंदर कदम म्हणाले, आ.शिवाजीराव कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका खरेदी विक्री संघाच्या वतीने गावात छावणी चालवून शेतकऱ्यांचे पशुधन वाचविण्याचे काम करण्यात आले आहे. या छावणीत सर्व शेतकरी एकदिलाने एका कुटुंबा प्रमाणे राहत होते. छावणी सोडताना अनेकांचे हृदय भरून येत आहे, एवढा एकोपा यानिमित्ताने निर्माण झाला होता. या गावाची एक वेगळी ओळख आहे, ती जपण्यासाठीच हरी कीर्तनाने छावणीचा समारोप करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले.
Post a Comment