माय नगर वेब टीम
अहमदनगर -
शासनाने चारा छावण्या बंद करण्याचा कोणताही आदेश दिला नाही. त्यामुळे नगर तालुक्यातील छावण्या सुरू राहणार आहेत. मात्र काही छावण्यातील शेतकऱ्यांनी मध्यंतरी झालेल्या पावसामुळे जनावरे घरी नेल्यामुळे या छावण्या पशुधनाअभावी बंद करण्याची वेळ आली. त्यात पावसाने दडी मारल्याने अन् चाराच उपलब्ध नसल्याने जनावरांचा पोटमारा होत आहे. बंद झालेल्या चारा छावण्या पुन्हा सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी व छावणीचालकांनी आमदार शिवाजी कर्डीले यांची भेट घेवून छावण्या पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. चारा छावणीचे अनुदान आले असले तरी चालकांना अनुदान मिळत नसल्याच्या तक्रारी चालकांनी आ. कर्डीले यांच्याकडे केल्या. शेतकरी व चालकांच्या अडचणी जाणून घेत. आ. कर्डीले यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करून दुष्काळात शेतकऱ्यांच्या अडचणीचा निपटारा करण्याचे आदेश दिले.
तालुक्यात ६६ चारा छावण्या सुरू होत्या. मध्यंतरी झालेल्या पावसाने काही छावण्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी जनावरे दावणीला नेल्याने बंद झाल्या. मात्र पावसाने दडी मारल्याने त्यात चाराच मिळेनाशे झाल्याने जनावरांची उपासमार होत आहे. या छावण्या पुन्हा सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. चारा छावण्यांची बीले छावणीचालकांनी दिले आहेत. मात्र चालकांना अनुदान मिळाले नसल्याच्या तक्रारी या वेळी चालकांनी आ. कर्डीले यांच्याकडे केल्या आहेत. यावेळी आ. कर्डीले यांनी याबाबत जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार यांच्याशी चर्चा केली. छावणीचालकांना चारा उपलब्ध करण्यासाठी मोठया आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उधारीवर चारा मिळणे कठीण झाल्याने छावणीचे अनुदान तात्काळ चालकांना देण्याचे आदेश दिले.
शासनाने चारा छावण्या बंद करण्याचा कुठलाही आदेश दिला नाही. मात्र पावसामुळे तालुक्यातील ज्या छावण्या बंद झाल्या त्या पुन्हा सुरू कराव्यात. त्यासाठी नविन प्रस्ताव न घेता फक्त चालकांचे अर्ज घेऊन या छावण्यांना परवानगी देण्यात यावी. चारा उपलब्ध होईपर्यत छावण्या सुरू राहणार असल्याचे कर्डीले यांनी शेतकऱ्यांना या वेळी सांगितले.
छावण्यांबाबत राजकारण करू नये : दिलीप भालसिंग
तालुक्यातील नेत्यांकडून छावण्यांबाबत राजकारण सुरू आहे. छावण्या सुरु करण्यासाठी आंदोलन करून राजकीय स्टंट केला जात आहे. चारा छावण्या बंद करण्याचा शासनाचा कोणताही आदेश नाही. ज्या चारा छावण्या बंद झाल्यात त्या शेतकऱ्यांनी जनावरे घरी नेल्यामुळे झाल्यात. या छावण्या सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याशी आ. कर्डीले यांनी चर्चा केली आहे. छावण्या सुरू करण्यासाठी नव्याने प्रस्ताव न घेता केवळ चालकांकडून छावणी सुरू करण्यासाठी फक्त अर्ज दाखल करून घेवून छावणीसाठी मंजुरी देण्यात यावी. निवडणूक जवळ आल्याने विरोधकाकडून छावण्यांचे श्रेय न घेता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढे यावे, असे भाजपाचे तालुकाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी म्हटले आहे.
Post a Comment