
माय नगर वेब टीम
मुंबई - उस्मानाबाद सहकारी बँकेचे तत्कालीन अध्यक्ष पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येच्या खटल्यात २७ जून रोजी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची साक्ष होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ही साक्ष होणार आहे.
माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यावर राजकीय वैमनस्यातून पवनराजे निंबाळकर यांची हत्या केल्याचा आरोप आहे. कें द्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणाचा तपास केला असून सुनावणी मुंबई येथे विशेष सत्र न्यायालयात सुरु आहे. निंबाळकर यांच्या बरोबरच हजारे यांच्या हत्येची सुपारी पद्मसिंह पाटील यांनी आपणास दिली होती, असा लेखी जबाब या प्रकरणातील आरोपी पारसमल जैन (राजस्थान) याने सीबीआय चौकशीदरम्यान दिला आहे.जैन याच्या जबाबावरुन पद्मसिंह पाटील यांच्या विरोधात हजारे यांच्या हत्येचा कट रचण्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल आहे. त्यामुळे हजारे यांच्या साक्षीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
पवनराजे निंबाळकर यांची ३ जून २००६ रोजी कळंबोली ( मुंबई ) येथे हत्या झाली होती. या हत्येप्रकरणी चार भाडोत्री मारेकऱ्यांना अटक करण्यात आली. या आरोपींपैकी पारसमल जैन या आरोपीने निंबाळकर यांच्या बरोबरच हजारे यांच्या हत्येची सुपारी माजी मंत्री पद्मसिंह पाटील यांनी आपणास दिली होती असा लेखी जबाब सीबीआयच्या चौकशीदरम्यान दिला आहे.या पार्श्वभूमीवर पवनराजे यांच्या पत्नी आनंदीबाई निंबाळकर यांनी या प्रकरणात हजारे यांची साक्ष नोंदवावी, अशी विनंती विशेष न्यायालयाला केली होती. मात्र न्यायालयाने आनंदीबाईंची विनंती फेटाळली होती. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात हजारे यांची साक्ष आवश्यक असल्याचे स्पष्ट करीत त्यांची साक्ष नोंदवण्याचे निर्देश विशेष सत्र न्यायालयाला दिले. त्यानुसार २७ जून रोजी हजारे यांची साक्ष होणार आहे.
तत्कालीन पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह नबाब मलिक, विजयकुमार गावित, सुरेश जैन या मंत्र्यांवर हजारे यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले होते. या आरोपांची चौकशी व्हावी या मागणीसाठी हजारे यांनी आझाद मैदान (मुंबई)येथे उपोषण केले होते.त्यानंतर तत्कालीन सरकारने या मंत्र्यांवरील आरोपांच्या चौकशीसाठी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांचा आयोग नेमला. न्या.सावंत आयोगाच्या चौकशीत दोषी आढळल्याने पाटील,मलिक,गावित,जैन या मंत्र्यांना मंत्रिपदावरून पायऊ तार व्हावे लागले.
हजारे यांनी पद्मसिंह पाटील यांच्या अधिपत्याखालील तेरणा सहकारी साखर कारखाना व उस्मानाबाद जिल्हा सहकारी बँकेतील गैरव्यवहार उघडकीस आणत पद्मसिंह पाटील यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती. तसेच हजारे यांच्यामुळेच आपले मंत्रीपद गेले,या रागातून पद्मसिंह पाटील यांनी हजारे यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचा व हजारे यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप पाटील यांच्यावर आहे. यासंदर्भात पारनेर पोलीस ठाण्यात २६ सप्टेंबर २००९ रोजी शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ३० सप्टेंबर २००९ रोजी हा गुन्हा लातूर पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. या गुन्ह्यत पाटील यांना अटक झाली होती. सध्या त्यांना जामीन मिळाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येप्रकरणात हजारे यांच्या साक्षीला महत्त्व प्राप्त झालेआहे.
आपणास सुरुवातीला दोन बडय़ा आसामींना संपवायचे असल्याचे सांगण्यात आले. दोघांच्या हत्येसाठी प्रत्येकी तीस लाख रुपयांची सुपारी देण्यात आली. मात्र मला जेव्हा पवनराजेंबरोबरच हजारे यांचीही हत्या करायची असल्याचे समजल्यावर मी हजारे यांची हत्या करण्यास नकार दिला. हजारे यांच्यासारख्या महात्म्याची, त्यागी, संन्याशी माणसाची हत्या करणे आपल्याला पटले नाही, असा लेखी जबाब या खटल्यातील आरोपी पारसमल जैन याने सीबीआय तपासात दिला आहे. हजारे यांच्या हत्येस नकार दिल्यावर,पवनराजे यांच्यापेक्षा हजारे यांची हत्या करणे जास्त सोपे आहे असे आपणास सांगण्याचा प्रयत्न झाला, मात्र मी बधलो नाही असे जैन याने जबाबात म्हटले आहे.
Post a Comment