केडगावचा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करा - महापौरांच्या संबंधितांना सूचना



माय नगर वेब टीम

अहमदनगर

केडगाव उपनगरातील काही भागात दोन तर काही भागात चार दिवसाला पाणी पुरवठा होत आहे. तसेच काही भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून केडगावचा पाणी पुरवठा तातडीने सुरळीत करा अशा सूचना महापौर बाबासाहेब वाकळे यांनी संबंधित अधिकाऱयांना दिल्या.

केडगांव परिसराला पाणी पुरवठा सुरळीत होण्‍याच्‍या दृष्टिने विभागाची आढावा बैठक गुरूवार दिनांक 13/6/2019 रोजी सकाळी 11-00 वाजता महापौर बाबासाहेब वाकळे यांनी घेतली. यावेळी उपमहापौर मा.सौ.मालनताई ढोणे, नगरसेवक मनोज कोतकर, राहुल कांबळे, उपायुक्‍त प्रदिप पठारे, सुरज शेळके, गणेश नन्‍नवरे, अभियंता श्री.काकडे, केडगांव विभाग प्रमुख सुखदेव गुंड तसेच फिटर, व्‍हॉलमन आदी उपस्थित होते.



यावेळी महापौर वाकळे यांनी केडगांव भागात किती उंच टाक्‍या आहेत, नळ कनेक्‍शन किती आहेत, उपलब्‍ध कर्मचारी याची माहिती घेतली. केडगांव भागामध्‍ये काही भागात 2 दिवसाआड पाणी पुरवठा तर काही भागामध्‍ये 4 दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. कापरे मळा उंच भागात असल्‍यामुळे सदर भागात पाणी पुरवठा करण्‍यास अडचण असल्‍यामुळे आवश्‍यक त्‍या उपाय योजना करून त्‍या ठिकाणी पाणी पुरवठा करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. इंदिरा नगर भागामध्‍ये टॅकरने पाणी पुरवठा केला जातो. सदर टॅकरच्‍या खेपा व्‍यवस्थित करित नसल्‍यास तो टॅकर रद्द करून नविन टॅकर सुरू करण्‍या बाबत निविदा काढण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. केडगांव भागात लाईन लिकेज झाल्‍यास दुरूस्‍ती करण्‍यासाठी जेसीबी व मशिनरी उपलब्‍ध करून देण्‍याबाबत आदेश दिले. बाबर मळा या भागात असलेल्‍या लाईनवर अनाधिकृत कनेकशनवर कारवाई करून बंद करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या. कायनेटीक चौक परिसरात पाण्‍याच्‍या लाईनला प्रेशर नसल्‍यामुळे या परिसरात नागरिकांना कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. पाणी पुरवठा सुरळीत होण्‍याच्‍या दृष्टिने त्‍या भागात काय उपाय योजना कराव्‍या लागतील त्‍या तातडीने करण्‍याच्‍या सुचना दिल्‍या.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post