मुंबई : वेगवेगळ्या कारणास्तव राजीनामे दिलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या चार आमदारांचे राजीनामे विधानसभाध्यक्ष हरीभाऊ राठोड यांनी मंजूर केले. यात धुळ्याचे भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे, तर शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव, सुरेश धानोरकर आणि प्रताप पाटील चिखलीकर या चौघांचा समावेश आहे.
औरंगाबादमधील कन्नड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मराठा आरक्षणाच्या कारणास्तव काही महिन्यापूर्वी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा दिला होता. मात्र, तो स्वीकारला गेला नव्हता. मात्र, जाधव यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांच्याविरोधात बंड करत अपक्ष निवडणूक लढविली आहे.
नांदेडमधील लोहा-कंधार विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे गेल्या वर्षीच भाजपाच्या गोटात गेले होते. नांदेड महापालिका निवडणुकीदरम्यान त्यांनी भाजपचे नेतृत्त्व केले होते. आता भाजपने त्यांना नांदेडमधून लोकसभेला मैदानात उतरले होते. त्यांनीही आपला राजीनामा दिला होता.
धुळ्यातील भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी पक्षाविरोधात बंड केल्यानंतर राजीनामा दिला होता. धुळे महापालिकेत गोटे यांनी स्वतंत्र पॅनेल उभे केले होते. गोटे यांनी भाजपचे उमेदवार सुभाष भामरे यांना पराभूत करण्यासाठी धुळे लोकसभा निवडणूक लढविली.
विदर्भातील वरोरा विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार सुरेश (बाळू) धानोरकर यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. धानोरकर यांनी चंद्रपूरमधून भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांच्याविरोधात निवडणूक लढविली आहे.

Post a Comment