चारा छावण्यांची देयके न मिळाल्याने छावणीचालक मोठ्या आर्थिक संकटात / जिल्हाधिकाऱ्यांकडे छावणीचालकांनी मांडल्या व्यथा
माय नगर टीम
भयंकर दुष्काळी परिस्थितीमुळे शासनाने सुरु केलेल्या जनावरांच्या चारा छावण्यांची देयके २ महिने उलटून गेली तरी अद्याप मिळाली नसल्याने छावणीचालक मोठ्या आर्थिक संकटात सापडले असून चारा खरेदीला पैसाच शिल्लक न राहिल्याने जनावरांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे दि. १० मे पूर्वी देयके देण्यात यावीत अन्यथा नाईलाजाने छावण्या बंद कराव्या लागतील असा इशारा छावणीचालकांनी दिला आहे.
या संदर्भात नगर व पाथर्डीच्या छावणीचालकांनी सोमवारी (दि.६) सकाळी आ. शिवाजीराव कर्डिलेंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी,निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील यांची भेट घेवून आपल्या व्यथा मांडल्या आहेत. यावेळी रेवणनाथ चोभे, बाळासाहेब मेटे, अभिलाष घिगे,संजय काळे, पुरुषोत्तम आठरे, एकनाथ अटकर, वैभव खलाटे, बाळासाहेब अकोलकर, नवनाथ पाठक, शरद मुळे, संतोष शिंदे, रावसाहेब वांढेकर,एकनाथ वांढेकर, मधुकर वांढेकर, रामेश्वर फसले आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की,जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली असल्याने जनावरांचा चारा व पशुखाद्य, पाणी टंचाई चा प्रश्न निर्माण झाल्याने शासन निर्णयानुसार जनावरांच्या चारा छावण्या सुरु करण्यात आल्या आहेत.नगर व पाथर्डी तालुक्यातील छावण्या दि.१मार्च पासून चालू झालेल्या आहेत.चारा छावण्या सुरु होवून दोन महिने होत आले आहेत तरी शासकीय अनुदान दिलेले नाही. उलट तपासणी करुन कोणतीही शहानिशा न करता छावणीचालक संस्थेवर दंडात्मक कारवाई केलेली आहे.
छावणी चालक संस्थेस मंजूरी देताना, साधारण ३० लक्ष रुपये खर्च करण्यासाठीचे हमीपत्र घेतले आहे, परंतु ३० लक्ष रुपये खर्चाची कमाल मर्यादा संपलेली आहे. तसेच आपण मंजुरी देताना १५ दिवसाचे देयके दिले जातील असे सांगितले होते. प्रत्यक्ष मात्र दोन महिने उलटून सुद्धा देयके मिळाली नाहीत. एका बाजूने दुष्काळात होरपळत असलेले शेतक-यांचे पशुधन व दुस-या बाजूने शासनाच्या जाचक अटी या मध्ये छावणीचालक सापडलेला आहे. त्यामुळे छावणी चालक पूर्णपणे आर्थिक अडचणीत आलेले आहेत याचा देखील शासनाने गांभीर्याने विचार करावा. तरी आपण वरील बाबीचा विचार करून छावण्यांना देय होणारे अनुदान तत्काळ देण्यात यावी हि विनंती. तरी कृपया दि. १० मे पूर्वी छावणी चालकांना छावणीचे देयके मिळवीत. अन्यथा आर्थिक अडचणी अभावी छावण्या बंद करण्याचा निर्णय छावणी चालकांना घ्यावाच लागेल. याची संपूर्ण जबाबदारी जिल्हा प्रशासन यांची राहील असा इशारा यावेळी देण्यात आला आहे.
नगर तालुक्यातील छावणीचालकांनी दि. ११ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्या अडचणी तसेच प्रशासनाने केलेल्या दंडात्मक कारवाई बाबत आपल्या व्यथा निवेदनाद्वारे व प्रत्यक्ष मांडल्या. त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी छावणीचालक संस्थेवर अनियमिततेचा ठपका ठेऊन दंडात्मक कारवाई थांबवून वस्तुस्थितीची पडताळणी करून छावणीचालक यांना समज देऊन व झालेली चूक पुन्हा न होऊ देण्याची समज दिल्यानंतर जर छावणीचालकाने त्या चूका पुन्हा केल्या तर दंडात्मक कारवाई केली जाईल असे तोंडी आदेश त्यावेळी दिले होते. तसेच दि. ११एप्रिल पर्यंत ज्या छावणीचालक संस्थेवर दंडात्मक कारवाई झालेली आहे त्यांनी सदरचे आलेले दंडात्मक कारवाई करणेचे पत्रावर अपील आपले कार्यालयाकडे केलेले आहे. परंतु अद्यापपर्यंत सुनावणीसाठी बोलावले नाही अथवा खुलासा मागविलेला नाही. यामध्ये झालेले दंड हे विनाकारण व अवास्तव आहेत ते रद्द करावेत अशी मागणीही पुन्हा यावेळी करण्यात आली आहे.
Post a Comment