अभिनेता विकी कौशलला सेटवर अपघात, गालाच्या हाडाला फ्रॅक्चर



मुंबई : 
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता विकी कौशल चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाला आहे. साहसी दृश्याचं चित्रीकरण करताना दरवाजा आपटून विकीच्या गालाच्या हाडाला फ्रॅक्चर झालं आहे. त्यामुळे विकीच्या चेहऱ्यावर 13 टाके घालावे लागले.

भानू प्रताप सिंग यांचं दिग्दर्शन असलेल्या आगामी भयपटाचं शूटिंग करताना चित्रपटाच्या सेटवर विकीला अपघात झाला. गुजरातमधील अलंगमध्ये या सिनेमाचं शूटिंग सुरु होतं. विकीला धावत जाऊन दरवाजा उघडायचा होता, मात्र काही तांत्रिक चुकांमुळे दरवाजा विकीच्या तोंडावर आपटला. त्यानंतर विकीला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं.

अलंगमध्ये जहाज नष्ट करणारं सर्वात मोठं यार्ड आहे. याठिकाणी चित्रपटाचं युनिट दिवसरात्र शूटिंग करत होतं. रात्रीच्या वेळी विकी आणि काही कलाकारांचं दृश्य चित्रित करताना हा अपघात झाला.

'उरी'चा दिग्दर्शक आदित्य धरसोबत विकी कौशल एका अॅक्शनपटात झळकणार आहे. शूजित सरकार यांचा 'उधम सिंग', करण जोहरचा 'तख्त', अश्वत्थामावर आधारित एका चित्रपटातही विकी दिसणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post