संभाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी युवकाने लिहिले रक्ताने पत्र
माय नगर वेब टीम
अहमदनगर- हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांचा पुर्णाकृती पुतळा शहरात उभारण्यात यावा या मागणीसाठी शिवप्रेमी व विनायकराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनय वाखुरे पाटील यांनी स्वत:च्या रक्ताने निवेदन लिहिले असून ते महापौर बाबासाहेब वाकळे यांना दिले आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती मंगळवारी (दि.14) शहरात मोठ्या उत्साहात साजरी होत असताना विनय वाखुरे पाटील यांनी या जयंतीनिमित्त महापालिकेत महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेऊन निवेदन दिले. हे निवेदन त्यांनी आपल्या रक्ताने लिहिले आहे. निवेदन देतेवेळे शिवप्रेमी प्रतिष्ठानचे प्रशांत दारकुंडे, संजय ढोणे आदी उपस्थित होते.
शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा असावा अशी शिवप्रेमींची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. महापालिकेच्यावतीने हा पुतळा उभारण्यात यावा यासंदर्भात यापुर्वी अनेकदा महापालिका आयुक्त तसेच पदाधिकार्यांना निवेदने देऊन पाठपुरावाही करण्यात आलेला आहे. महापालिकेने सावेडी उपनगरातील प्रोफेसर कॉलनी चौकात पुर्णाकृती पुतळ्याचा प्रस्ताव मंजुर केला असून 10वर्षांपुर्वीच पुतळा तयार करणार्या कलाकाराला सुमारे साडेसात लाख रुपये मानधनही अदा केलेले आहे. मात्र प्रशासनाकडून याबाबत परवानगीचे कारण सांगुन पुतळा उभारण्यास विलंब केला जात आहे. त्यामुळे शिवशंभु भक्तांच्या भावनांचा आदर करुन महापालिका प्रशासनाने तातडीने हा पुतळा उभारावा अशी मागणी विनय वाखुरे यांनी यावेळी महापौरांकडे केली.
तसेच कोणता विभाग पुतळा उभारण्यास परवानगी देत नाही याची माहिती शिवप्रेमींना द्यावी, त्या विभागाकडे शिवप्रेमी पाठपुरावा करतील, असेही वाखुरे यांनी म्हटले आहे.
Post a Comment