कापड बाजारातील अतिक्रमणे हटविले : प्रशासन व व्यापाऱ्यांमध्ये वाद




माय नगर वेब टीम

अहमदनगर – शहरातील बाजारपेठेत होणारी गर्दी पाहून, वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी विभागाने व पोलिस प्रशासनाने मंगळवारी (दि.28) संयुक्त कारवाई केली. या कारवाईनंतर रात्री कापड बाजारमध्ये फेरीवाले, कापड बाजारातील व्यापारी व पोलिस यांच्यात वाद झाला. आ. संग्राम जगताप यांनी घटनास्थळी येत सामंजस्याची भूमिका घेऊन मध्यस्थी करत हा वाद मिटविला. त्यामुळे कापड बाजारात काही वेळ तणावाची स्थिती होती.


कापड बाजार परिसरातील अतिक्रमणे व वाहतूक कोंडीबाबत महात्मा गांधी रोड व्यापारी असोसिएशनने जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन देवून या समस्येकडे त्यांचे लक्ष वेधले होते. शहरात तेलीखुंट चौक ते भिंगारवाला चौक महात्मा गांधी रोड या ठिकाणापर्यंत नो एन्ट्री आहे. या ठिकाणी सर्व प्रकारच्या वाहनासाठी प्रवेश निषिद्ध आहे, परंतु गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी कुठलेही वाहतूक नियंत्रण शाखेतील पोलिस कर्मचारी हजर नसतात. त्याचप्रमाणे या ठिकाणी कुठलाही पोलिस अधिकारी वर्ग इकडे फिरकत नाही. त्यामुळे कायम वाहतूक कोंडी असते. त्याचप्रमाणे येथे भयंकर प्रमाणात फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे.


त्यामुळे येथे कायम वाहतूक कोंडी व पार्किंगसंबंधी ग्राहकांचे फेरीवाल्यांसोबत वाद निर्माण होतात. यामुळे ग्राहकवर्ग नाराज होतात. यामुळे व्यावसायिकांचे नुकसान होत असल्याचे व्यापारी असोसिएशनने म्हटले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने व पोलिसांनी संयुक्तपणे खिस्त गल्ली, कापड बाजार व घास गल्लीतील सुमारे 50 ते 60 फेरीवाले आणि टपरीधारकांची अतिक्रमणे काढून रस्ता वाहतुकीसाठी रिकामा केला. मात्र, त्याचवेळी कापड बाजारातील व्यापार्‍यांनी दुकानांसमोरील रस्त्यावर ठेवलेल्या जाळ्या काढण्यात आल्या नाहीत. यावर फेरीवाल्यांनी आक्षेप घेतला असता, पोलिसांनी या जाळ्या जप्त केल्या. त्यामुळे पोलिस, फेरीवाले व व्यापारी यांच्यात काही काळ वाद झाला. जप्त केलेल्या जाळ्या कोतवाली पोलिस ठाण्यात ठेवण्यात आल्या. घटनेची माहिती मिळताच आ. संग्राम जगताप घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी फेरीवाले व व्यापारी यांची समजूत घालून, सामंजस्याची भूमिका घेत वाद मिटविला.


शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम युवासेनेचे विक्रम राठोड यांनीही यावेळी कापड बाजारात येवून व्यापार्‍यांशी चर्चा केली. हा वाद मिटल्यानंतर पोलिसांनीही जप्त केलेल्या जाळ्या व्यापार्‍यांना परत केल्या. दरम्यान महापालिकेकडून बाजारपेठेत अतिक्रमणे करणार्‍यांवर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाचे प्रमुख सुरेश इथापे यांनी सांगितले. या कारवाईत महापालिकेचे सुमारे 20 कर्मचारी सहभागी झाले होते.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post