उपसचिवांच्या आदेशाला सीईओंकडून केराची टोपली
मजले चिंचोली येथील ग्रामसेवक व माजी उपसरपंचावर कारवाईस टाळाटाळ । सरपंच परिषदेच्या वतीने 27 मे ला जिल्हा परिषदेत करणार आंदोलन
माय नगर वेब टीम
अहमदनगर
तालुक्यातील मजले चिंचोली येथील विद्यमन सरपंचाना आंधारात ठेवून माजी उपसरपंच व ग्रामसेवक यांनी बोगस ठराव व सह्या करून मुख्यमंत्री पेयजल योजणेसह अनेक ठराव जिल्हा परिषदेत सादर करून मोठा अपहार केला आहे. त्यांनी ग्रामपंचायतीची व शासनाची फसवणूक केली आहे. याबाबत ग्राम विकास विभागाचे उपसचिव यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कारवाईच्या सुचना देवूनही संबंधितांवर कारवाईस टाळाटाळ केली जात आहे. उपसचिवाच्या आदेशाला सीईओ नी केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप सरपंच परिषदेचे अनिल गीते पाटील, अविनाश आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. दरम्यान मजले चिंचोली ग्रामपंचायत तीत सुमारे 80 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे सरपंच आव्हाड यांनी सांगितले.
यावेळी सरपंच परीषदेचे अनिल गिते पाटील, अविनाश आव्हाड, पिंपरी गवळीच्या सरपंच अश्विनी थोरात, सरपंच गितांजली आव्हाड आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
मजले चिंचोली येथील माजी उपसरपंच धर्मनाथ आव्हाड व ग्रामसेवक श्रीकांत जराड यांनी संगनमत करून विद्यमान महिला सरपंचाना आंधारात ठेवून विविध योजनांचा बोगस ठराव व सह्या घेवून जिल्हा परिषदेत सादर केले आहे. अनेक कामात अफरातफर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री पेयजल योजना, बेकायदेशीर जलयुक्त शिवार संकलन निधी स्थापन करून शासनाचा निधी वर्ग केला आहे. ग्रामपंचायतीचे उत्पन्न जमा न करता स्वत: जवळ ठेवणे, बेकायदेशीरपने वनव्यवस्थापन समिती स्थापन करून त्यामध्ये गैरव्यहार करणे हा प्रकार उघडकीस येवूनही संबंधीत प्रशासन कारवाईस टाळाटाळ करत आहे. लवकरात लवकर कारवाई न झाल्यास सरपंच परिषदेच्या वतीने 27 मे रोजी जिल्हा परिषदे समोर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच या आंदोलनात सर्व सरपंचांनी सहभागी होण्याचे आवाहन सरपंच परिषदेचे अनिल गीते पाटील यांनी केले आहे.

Post a Comment