स्वच्छ प्रतिमा..अभ्यासू दृष्टिकोन ; अक्षय कर्डिले यांच्यावर मतदारांचा विश्वास
मोठ्या मताधिक्याने होणार विजय ; उपसभापती रभाजी सुळ
माय नगर वेब टीम
नगर तालुका : राहुरी विधानसभा मतदारसंघात अक्षय कर्डिले यांच्यावर मतदारांचा दिवसेंदिवस विश्वास वाढत चालला आहे. निष्कलंक चारित्र्य, प्रामाणिक कामाची पद्धत आणि सखोल अभ्यासू वृत्ती यामुळे त्यांनी अल्पावधीतच मतदारांच्या मनात वेगळी ओळख निर्माण केली आहे. सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याची कसब अक्षय कर्डिले यांनी आत्मसात केल्याने त्यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार असल्याचा विश्वास बाजार समितीचे उपसभापती रभाजी सुळ यांनी व्यक्त केला आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर तालुक्यातील कार्यकर्त्यांशी रभाजी सुळ यांनी संवाद साधला. राजकारणात विश्वासार्हता हीच खरी ताकद मानली जाते,आणि हाच गुण अक्षय कर्डिले यांच्या नेतृत्वात प्रकर्षाने जाणवतो. विविध सामाजिक प्रश्नांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचवण्याची त्यांची शैली ही इतरांपेक्षा वेगळी ठरते. केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामावर भर देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख तयार होत आहे.
स्थानिक पातळीवरील प्रश्न असो वा व्यापक विकासाचे मुद्दे प्रत्येक बाबतीत त्यांनी मांडलेली भूमिका ही अभ्यासपूर्ण आणि संतुलित असल्याचे कार्यकर्ते व नागरिक सांगतात. त्यामुळेच “स्वच्छ प्रतिमा आणि सक्षम नेतृत्व” अशी ओळख त्यांच्याशी जोडली जात आहे. राहुरी मतदार संघात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये एक सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, प्रामाणिक व अभ्यासू नेतृत्वाला पाठिंबा देण्याची मानसिकता वाढताना दिसत आहे. अक्षय कर्डिले यांच्या रूपाने मतदारांना एक सक्षम पर्याय मिळाल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.
अक्षय कर्डिले यांना गावोगावी वाढता पाठिंबा मिळत असून स्वयंस्फूर्तीने नागरिक प्रचारात उतरत आहेत. स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांनी कार्यकर्त्यांची तयार केलेली फौज प्रचारात सक्रिय झाली आहे. तरुणांची मोठी फळी कर्डिले यांच्या पाठीशी उभी आहे. तरुणांमध्ये अक्षय कर्डिले यांची वेगळी क्रेज निर्माण झालेली आहे. त्याचा निवडणुकीत निश्चितच फायदा होणार आहे. विजय निश्चित असून निकालाच्या दिवशी फक्त मताधिक्य किती राहणार याकडेच मतदारांची लक्ष आहे असेही सुळ यांनी सांगितले.
मतदार संघाच्या विकासाचा मास्टर प्लॅन !
राहुरी मतदार संघाच्या विकासाचा मास्टर प्लॅन अक्षय कर्डिले यांनी तयार केला असून विजयानंतर त्यावर काम सुरू करण्यात येणार आहे. स्वर्गीय कर्डिले यांनी मतदार संघाच्या विकासाचे पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय कर्डिले तत्पर राहणार यात शंका नाही. मतदार संघाच्या विकासासाठी राज्यातील ज्येष्ठ नेते, पालकमंत्री व विविध आमदार यांनी कर्डिले यांना सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर मतदार संघ राज्यात आदर्श मॉडेल म्हणून नावारूपास येईल.
......रभाजी सुळ ( उपसभापती बाजार समिती)

Post a Comment