पारनेरमध्ये राजकीय रणधुमाळी पेटली! खासदार निलेश लंके यांचा दौरा ठरतोय चर्चेचा विषय..



माय नगर वेब टीम 

पारनेर : जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पारनेर तालुक्यात राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली असून, खासदार निलेश लंके यांनी आता थेट मैदानात उतरून मोर्चेबांधणी सुरू केली आहे. येत्या शनिवार, २५ एप्रिल रोजी होणाऱ्या त्यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते मोहनराव रोकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा दौरा केवळ औपचारिक नसून निवडणुकीपूर्वीची ‘ग्राउंड टेस्ट’ मानला जात आहे. लंके हे थेट कार्यकर्त्यांमध्ये जाऊन गट-गणनिहाय समीकरणे तपासणार असून, कोणत्या ठिकाणी ताकद वाढवायची याचा बारकाईने आढावा घेणार आहेत.

शनिवारी सकाळी पारनेर शहरातून सुरू होणारा हा दौरा ढवळपुरी, टाकळी ढोकेश्वर, जवळा, निघोज आणि सुपा या महत्त्वाच्या गटांमध्ये धडकणार आहे. प्रत्येक ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बंद दाराआड चर्चा होणार असून, उमेदवारीपासून ते प्रचाराच्या रणनितीपर्यंत मोठे निर्णय होण्याची शक्यता आहे.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार पक्ष) आणि ‘निलेश लंके प्रतिष्ठान’च्या विविध शाखांचे उद्घाटनही होणार आहे. या माध्यमातून संघटन अधिक मजबूत करण्यावर लंके यांचा भर स्पष्ट दिसत आहे.

दरम्यान, स्वतः खासदार मैदानात उतरल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त उत्साह निर्माण झाला आहे. पारनेरमध्ये आता ‘कोण कुणाच्या बाजूने’ याची चाचपणी सुरू झाली असून, या दौऱ्यानंतर तालुक्यातील राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post