माय नगर वेब टीम
मुंबई : आयपीएल २०२६ चा दुसरा सामना मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये पार पडला. वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्स संघाने केकेआरवर सहा विकेटने विजय मिळवत इतिहास रचला आहे. केकेआरने मुंबईला दिलेले २२१ धावांचे लक्ष्य १९.१ ओव्हरमध्ये सहज पूर्ण करत १३ वर्ष पहिला सामना गमावण्याचा डाग पुसून काढला. त्यासोबतच मुंबईने इतिहासामधील सर्वाधिक धावांचे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले आहे. या सामन्यात रायन रिकेल्टनने सर्वाधिक ८१ धावा आणि रोहित शर्माने ७८ धावा करत विजयाचा पाया रचला. दोघांच्या वादळी खेळीसमोर केकेआरच्या गोलंदाजांनी गुडघे टेकले होते. २२१ धावांचा पाठलाग करताना दोघांनी १४८ धावांची सलामी देत खऱ्या अर्थाने केकेआरला बॅकफूटला ढकलत सामना पूर्णपणे झुकवला होता. त्यानंतर कॅप्टन हार्दिक पांड्या आणि नमन धीर यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह मुंबईने पहिल्याच सामन्यात विजयाचा श्रीगणेशाे केला आहे.
या सामन्यात मुंबई इंडियन्सचा हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना, केकेआरने फिन ॲलन आणि अजिंक्य रहाणे यांच्या जोरावर धडाकेबाज सुरुवात केली, ज्यांनी ५.२ षटकांत पहिल्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. ॲलन १७ चेंडूंमध्ये सहा चौकार आणि दोन षटकारांसह ३७ धावा करून बाद झाला. त्यानंतर रहाणे आणि ग्रीन यांनी २१ चेंडूंमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ४० धावांची भागीदारी केली. संघाची धावसंख्या १०९ असताना ग्रीन १० चेंडूंमध्ये १८ धावा करून बाद झाला.
मुंबईकडून शार्दुल ठाकूरने घेतल्या सर्वाधिक तीन विकेट्स –
त्यानंतर रहाणेने अंगक्रिश रघुवंशीसोबत तिसऱ्या विकेटसाठी ३६ धावा जोडून संघाची धावसंख्या १४५ पर्यंत पोहोचवली. रहाणे तिसऱ्या विकेटच्या रुपाने बाद झाला, त्याने ४० चेंडूंमध्ये पाच षटकार आणि तीन चौकारांसह शानदार ६७ धावा केल्या. रहाणे बाद झाल्यानंतर, रघुवंशी आणि रिंकू सिंग यांनी डाव सावरला आणि ३० चेंडूंमध्ये चौथ्या विकेटसाठी ६० धावा जोडून संघाची धावसंख्या २०५ पर्यंत पोहोचवली. या धावसंख्येवर रघुवंशी चौथ्या विकेटसाठी बाद झाला. त्याने २९ चेंडूंमध्ये दोन षटकार आणि सहा चौकारांसह ५१ धावा केल्या होत्या. रिंकू सिंग चार चौकारांसह २१ चेंडूंमध्ये ३३ धावांवर नाबाद राहिला, तर रमणदीप सिंग चार धावांवर नाबाद राहिला. मुंबईकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्ससाठी लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन या दोघांनी मिळून संघाला एक भक्कम सुरुवात करून दिली. ज्यामुळे सामना पूर्णपणे एकतर्फी झाला. रोहित आणि रिकल्टन यांनी पहिल्या विकेटसाठी १४८ धावांची सलामीची भागीदारी केली, जी आयपीएलच्या इतिहासातील मुंबई इंडियन्सची तिसरी सर्वोच्च सलामीची भागीदारी ठरली. रोहित शर्मा ३८ चेंडूंमध्ये ७८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तर रायन रिकल्टनने ८१ धावा केल्या. मुंबई इंडियन्सने १९.१ षटकांत ४ गडी गमावून हे लक्ष्य पूर्ण केले. केकेआरकडून वैभव अरोरा, कार्तिक त्यागी आणि सुनील नरेन यांनी प्रत्येकी १ विकेट्स घेतली.

Post a Comment