माय नगर वेब टीम
मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावात सविस्तर उत्तर दिलं. एआयबीचा प्राथमिक अहवाल, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केलेली तपासणी अन् सीआयडीच्या तपासातून आलेले निष्पन्न आज देवेंद्र फडणवीसांनी निवेदनातून मांडले. तसंच, अजित पवारांच्या अपघाताविषयी महाराष्ट्रात एफआयआर घेतला गेला नाही. त्यामुळे रोहित पवारांनी कर्नाटकात जाऊन एफआयआर नोंदवला. याचीही दखल देवेंद्र फडणवीसांनी घेत कर्नाटकाने राजकीय सुडबुद्धीने एफआयआर नोंदवला असल्याचं स्पष्ट केलं. तसंच, यावेळी त्यांनी अजित पवारांच्या अपघातामागे घातपात असेल तर संबंधितावर कठोर कारवाई करणार असल्याचंही आश्वासन फडणवीसांनी दिलं.
“एक अत्यंत महत्त्वाचं आणि संवेदनशील मुद्दा याठिकाणी रोहित पवार आणि इतर सदस्यांनी मांडला. मी यासंदर्भातील वस्तुस्थिती यापुढे मांडतो. २८ जानेवारी २०२६ रोजी बारामती येथे बारामती विमानतळ येथे धावपट्टीलगत व्हिएसआरसंचालित लिअरजेट या विमानाचा अपघात झाला. या दुर्दैवी घटनेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला. यासंदर्भात केंद्र सरकारने जी काही एसओपी आहे त्यानुसार कारवाई सुरू केली अन् चौकशी सुरू केली. राज्य गुन्हे अन्वेषन विभागानेही चौकशी सुरू केली. याचा तपास एसपी दर्जाच्या अधिकाऱ्याला तपासी अधिकारी केला आहे”, अशी माहिती देत त्यांनी तपसाताली काही महत्त्वाचे मुद्दे आज सभागृहात मांडले.
महाराष्ट्राची बदनामी व्हावी म्हणून कर्नाटकने एफआयआर दाखल केला
तसंच, आमदार रोहित पवार यांनी कर्नाटकातील बंगळुरू येथील पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला. त्यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “कर्नाटकने जे काही केलंय ते कर्नाटकने राजकीय दृष्ट्या महाराष्ट्रात तपास नीट चाललेलं नाहीय, अशा प्रकारचे महाराष्ट्राची मानहानी व्हावी म्हणून हा गुन्हा दाखल केलाय. कर्नाटकमधील पोलीस ठाण्यातील पोलिसांनी सांगायला पाहिजे होतं की हा झिरो एफआयआर नाहीय. महाराष्ट्रात एफआयआर दाखल करून घेतला गेला नसेल तर त्यांनी १७५३ च्या अंतर्गत कोर्टातून रजिस्ट्रर करून गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे होता.”
..तर त्याचा बापही खोदून काढू
“पण, तुम्ही काळजी करू नका. आकाशपातळ एक करू, पण या प्रकरणात घातपात असेल आणि त्यामागे कोणाचाही बाप असेल तरीही त्याला खोदून काढू, सहन नाही करणार”, अशा कडक शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांना आश्वासित केलं.
तसंच, ते पुढे म्हणाले, कदाचित, तुमच्या तीव्रतेपक्षा माझी तीव्रता कमी असू शकते. पण इतकीही बोथट नाहीय की अजितदादांच्या केसमध्ये कोणीही कॉन्सिरेन्सी करेल आणि आम्ही त्याला सोडून देऊ. त्याचा मुडदाही खणून काढू आम्ही. पुन्हा सांगतो की तुम्ही जे प्रयत्न करताय त्याला माझं समर्थन आहे. तुम्ही तरुण आहात, इतरांची तीव्रता कमी आहे, असं तुम्ही समजू नका.”
Post a Comment