माय नगर वेब टीम
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बुधवारी बारामती परिसरात विमान अपघातात मृत्यू झाल्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) करण्यात येणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी (२८ जानेवारी) मुंबईहून बारामतीकडे विमानातून निघाले होते. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी ते बारामतीत आले होते. एकाच दिवशी त्यांच्या बारामती परिसरात चार सभा होणार होत्या.
सकाळी आठच्या सुमारास मुंबईहून विमानाने उड्डाण केल्यानंतर बारामती विमानतळावर विमान उतरण्याच्या तयारीत असताना अपघात झाला. या अपघातात पवार यांच्यासह वैमानिक सुमीत कपुर, सहवैमानिक शांभवी पाठक, अटेंडंट पिंकी माळी, पवारा यांचा अंगरक्षक विदीप जाधव यांचा मृत्यृ झाला. पवार यांच्या पार्थिवावर गुरुवारी शोकाकूल वातावरणात बारामतीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
‘विमान अपघात प्रकरणाची नोंद बारामती पाेलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बारामती पोलीस ठाण्यातील दाखल प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडून करण्यात येणार आहे’, अशी माहिती सीआयडीचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांनी दिली. विमान अपघाताची चौकशी केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून सुरू करण्यात आली आहे.

Post a Comment