‘ड्रग्ज माफिया’ चत्तरसोबतचे विखेंचे फोटो ! ; खासदार नीलेश लंके यांचे विखे-पाटलांना थेट जाहीर आव्हान!



काचेच्या घरात बसून दगडफेक

खोट्या फोटोंच्या राजकारणाला प्रत्युत्तर

लंके आक्रमक

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर :   राजकारणात मुद्दे संपले की फोटो बाहेर काढायचे, बदनामीचा धुरळा उडवायचा आणि खोट्या प्रचारावर निवडणूक जिंकायची हा प्रकार आता उघडपणे सुरू आहे. मात्र, “ज्यांची घरे काचेची आहेत त्यांनी दुसऱ्यावर दगडं मारू नयेत” अशा शब्दांत खासदार नीलेश लंके यांनी माजी खासदार सुजय विखे-पाटील यांना जाहीर इशारा दिला आहे. ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या भूषण उर्फ ऋषी चत्तरसोबतचे विखे-पाटलांचे फोटो व्हायरल होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.



         खासदार लंके यांच्या पत्नी सौ. राणीताई लंके यांच्यासोबत ड्रग्जमाफिया ज्ञानदेव शिंदे याचा जुना फोटो व्हायरल करून, शिंदे हा लंके यांचा जवळचा कार्यकर्ता असल्याचा कांगावा विरोधकांनी केला. या आरोपांना लंके यांनी थेट आव्हान देत, “सार्वजनिक आयुष्यात हजारो लोक भेटतात, फोटो काढतात. कुणाच्या कपाळावर त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लिहिलेली नसते. एका फोटोवरून नाते जोडणे म्हणजे बालिशपणा आहे,” असे ठणकावले.

         “जर एका फोटोवरूनच ड्रग्जशी संबंध जोडायचा असेल, तर या प्रकरणातील मुख्य आरोपी भूषण उर्फ ऋषी चत्तर याच्यासोबत माजी खासदार सुजय विखे पाटील आणि पारनेरचे आमदार काशिनाथ दाते यांचे अतिशय जवळचे फोटो काय सांगतात?” असा सवाल करत लंके यांनी थेट आरसा दाखवला. “या तर्काने मग ‘ड्रग्ज माफिया’ कोण?” असा खडा सवाल उपस्थित करत विखेंच्या राजकारणावर घणाघात केला.

         या प्रकरणात कसलीही खातरजमा न करता बातम्या चालवणाऱ्या एका वृत्तवाहिनीवरही लंके यांनी ताशेरे ओढले. “हे दिशाभूल करणारे वृत्त आहे. सत्याचा कणही नाही. सायबर गुन्ह्याखाली गुन्हा दाखल करणार असून कायदेशीर लढाई लढू,” असे त्यांनी स्पष्ट केले.

          “विकासाची दृष्टी नाही, विकासाची मानसिकताही नाही. राजकीय मैदानात पराभव स्वीकारावा लागल्याने आता खोट्या बातम्या आणि फेक फोटो पेरून प्रतिमा मलीन करण्याचे बालिश प्रयत्न सुरू आहेत,” अशी घणाघाती टीका करत लंके म्हणाले की, पारनेरची आणि जिल्ह्याची स्वाभिमानी जनता या अपप्रचाराला बळी पडणार नाही.

           “कितीही खालच्या थराला जाऊन राजकारण केलं तरी निलेश लंके डगमगणार नाही. खरंच वाद घालायचा असेल तर तो विकासावर घाला. वेळ तुमची, जागा तुमची मी समोरासमोर जाहीर चर्चेला तयार आहे!” असे थेट आव्हान लंके यांनी दिले.

        “फेक फोटो आणि खोट्या बातम्यांनी अपयश झाकता येत नाही. ज्या पोलीस कर्मचाऱ्याचा उल्लेख तुम्ही करता, त्याला आशीर्वाद कुणाचा होता, नियुक्ती कुणाच्या शिफारसीने झाली हे जिल्ह्याला चांगलेच माहीत आहे,” असे सूचक विधान करत लंके यांनी विखे पिता-पुत्रांवर निशाणा साधला.

विखेंच्या कोर्टात चेंडू 

चोख प्रत्युत्तर देत निलेश लंके यांनी विरोधकांची कोंडी केली असून, राजकीय मैदानात आता आरोप प्रत्यारोप नव्हे तर विकास विरुद्ध अपप्रचार अशी थेट लढत उभी राहिली आहे. चेंडू आता विखेंच्या कोर्टात आहे. समोर येणार की फोटोआड लपणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post