अहिल्यानगर-पुणे महामार्गावर बिबट्याचा मृत्यू — अज्ञात वाहनाची धडक ठरली जीवघेणी



माय नगर वेब टीम
अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव शिवारात आज पहाटे दुर्दैवी घटना घडली. अहिल्यानगर-पुणे महामार्गावर सकाळी सुमारास सहा वाजता अज्ञात वाहनाने धडक दिल्याने नर जातीचा बिबट्या ठार झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, कामरगाव शिवारातील काळ्याच्या डोंगराच्या परिसरातून रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने बिबट्याला जोरदार धडक दिली. या अपघातात बिबट्या गंभीर जखमी झाला आणि काही अंतरावरच रस्त्याच्या कडेला कोसळून निपचित पडला.

ही घटना नवनाथ ठोकळ यांनी पाहून तात्काळ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कातोरे यांना कळविली. त्यांनी विलंब न करता वनविभागाच्या अधिकार्‍यांना माहिती दिली. त्यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी अविनाथ तेलोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल शैलेश बडदे, वनरक्षक कृष्णा गायकवाड व अन्य कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून बिबट्याला ताब्यात घेतले व पुढील कार्यवाहीसाठी वनपरिक्षेत्र कार्यालयात सुपूर्द केले.

घटनेची माहिती पसरताच महामार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी आपली वाहने थांबवून मोठी गर्दी केली होती.

मागील काही दिवसांपासून या भागात बिबट्यांचा वावर वाढल्याचे स्थानिक ग्रामस्थ सांगत आहेत. त्यामुळे शेतकरी आणि जनावरे चारणारे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post