माय नगर वेब टीम
अहिल्यानगर – नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील ग्रामदैवत पूर्वमुखी हनुमान मंदिरात अज्ञात समाजकंटकाने मूर्तीच्या चौथऱ्यावर मांसाचे तुकडे ठेवून विटंबना केल्याचा प्रकार २२ सप्टेंबर रोजी उघडकीस आला. या घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपींना अटक न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे.
ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, आरोपी तातडीने पकडला गेला नाही तर नगर–दौंड महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले जाईल. याबाबत ग्रामस्थांनी २४ सप्टेंबर रोजी नगर गाठून जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन द्यायचे ठरवले. मात्र अधीक्षक दौऱ्यावर असल्याने त्यांनी पोलिस उपअधीक्षक (नगर ग्रामीण) शिरीष वमने यांना निवेदन दिले.
घटना समजताच नगर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि. प्रल्हाद गिते हे मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक वमने यांच्यासह रॅपिड अॅक्शन फोर्सची तुकडी देखील गावात दाखल झाली होती. पोलिस अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना शांततेचे आवाहन करत आरोपीला लवकरच अटक होईल असे आश्वासन दिले.
याप्रकरणी विष्णु विजय खोसे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात समाजकंटकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास स.पो.नि. गिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे करत आहेत.
इतिहासात पहिल्यांदाच गावात अशी घटना घडल्याने गावातील शांतता, ऐक्य व बंधुभाव धोक्यात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
Post a Comment