कुकडी कालव्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण तातडीने करा – जलसंपदा मंत्री विखे पाटील यांचा अधिकाऱ्यांना आदेश



 होलेवाडी–चिलवाडीतील अतिवृष्टी नुकसान पाहणी 

माय नगर वेब टीम

कर्जत – कर्जत तालुक्यातील होलेवाडी, चिलवाडी आणि नवलेवाडी परिसरात अतिवृष्टीमुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कालव्याच्या अतिक्रमणामुळे आणि भराव खचल्याने पाणी थेट वाड्या-वस्त्यांमध्ये घुसले, नागरिकांचे हाल झाले. या पार्श्वभूमीवर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराजे देसाई यांनी प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांची भेट घेतली.

या पाहणीदरम्यान ग्रामस्थांनी आपल्या व्यथा मांडताच मंत्री विखे पाटील यांनी कुकडी कालव्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेश कुकडी प्रकल्पाच्या अधीक्षक अभियंता सौ. अहीरराव यांना दिले. यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.

👉 पुलाच्या कामाला वेग द्या!
अल्प लोकसंख्या असूनही वर्षानुवर्षे पुलाची मागणी प्रलंबित असल्याबाबत ग्रामस्थांनी तक्रार केली. यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी आणि कार्यकारी अभियंत्यांनी तातडीने काम सुरू करावे अशा कठोर सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.

👉 पंचनामे तातडीने पूर्ण करा!
झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरीत व्हावेत, यासाठी अधिक मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे, अशी सूचना जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली. मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही, असेही मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले.

👉 टिका करणाऱ्यांना विखेंचा सुनावणीचा इशारा
“संजय राऊत दररोज बोलतात, पण त्याला आम्ही महत्व देत नाही. वकील सदावर्ते माहूर देवीबाबत वक्तव्य करतात, पण माहूर आमची कुलदेवता आहे. अनेक वर्षांपासून मी तिथे जातो, देवी प्रसन्न होते. त्यांना होत नाही, तर त्यात माझा दोष नाही,” अशा शब्दांत मंत्री विखे पाटील यांनी टिकाकारांना प्रत्युत्तर दिले.

👉 सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी – शंभूराजे देसाई
या प्रसंगी मंत्री शंभूराजे देसाई म्हणाले, “शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्यासाठी सर्व मंत्री मैदानात आहेत. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे. महाविकास आघाडीच्या काळात रेड कार्पेट पाहणी दौरे झाले, त्याचे पुढे काय झाले? आजच्या संकटाच्या काळात आम्हाला राजकारण करायचे नाही,” अशा शब्दांत त्यांनी आ. रोहित पवार यांच्या टीकेला उत्तर दिले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post