सीना नदी पुलाच्या अर्धवट व चुकीच्या कामामुळे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात; खासदार लंके यांनी काय केली मागणी पहा



ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांकडून नुकसान भरपाई वसुल करावी, खा.निलेश लंके यांची मागणी 

माय नगर वेब टीम

अहिल्यानगर : नगर-कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाच्या अर्धवट कामाचा फटका परिसरातील वसाहतींना बसत आहे. पुलाच्या मोठ्या भिंतीमुळे पाण्याचा निचरा होत नसून पुराचे पाणी नागरिकांच्या  घरात शिरुन मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्याच्या शेतात पाणी घुसुन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकरी व नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर प्रकाराला सर्वस्वी संबंधित अधिकारी व ठेकेदार जबाबदार असून नागरिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई संबंधितांकडून वसूल करावी अशी मागणी खा.निलेश लंके यांनी केली आहे.


नगर-कल्याण रोडवरील सीना नदीवरील पुलाच्या कामाची खा.निलेश लंके यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी महापौर अभिषेक कळमकर, माजी नगरसेवक योगीराज गाडे, दत्ता जाधव, विक्रम राठोड, ओम काळे, राहुल घोरपडे, अभिषेक जगताप, चैतन्य ससे यांच्यासह राष्ट्रीय महागार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, ठेकेदाराचे प्रतिनिधी तसेच स्थानिक नागरिक उपस्थित होते. खा.लंके यांनी पुलाच्या अर्धवट व चुकीच्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत अधिकारी व ठेकेदार प्रतिनिधीला धारेवर धरले. तसेच काम योग्य पध्दतीने होण्याच्या दृष्टीने सूचना केल्या.


याबाबत खा.लंके यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र दिले आहे. सीना नदीवरील पुलाचे काम 21 महिने झाले तरी पूर्ण झालेले नाही. कामाची मुदतही संपून गेलेली आहे. जुन्या पुलाची स्थिती धोकादायक असून अपघातांची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. नव्या पुलाचे काम ठप्प असल्याने येथे वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. रूग्णवाहिका, शालेय बसेस, माल वाहतूक वाहने यांना मोठा अडथळा निर्माण होत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. सध्या सुरु असलेल्या सततच्या पावसामुळे जुन्या पुलावर पाणी भरून नागरिकांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे.याची सर्वस्वी जबाबदार संबंधित जबाबदारी व ठेकेदार एजन्सी हेच आहेत. तरी सदर कामाबाबत संबंधित एजन्सी व अधिकारी यांच्याकडून सविस्तर अहवाल तसेच काम मुदतीत पूर्ण का झाले नाही याबाबतचा अहवाल सादर करावा सदर विषय तातडीने मार्गी न लावल्यास हा विषय संसदेत उपस्थित करून उच्चस्तरीय चौकशी व जबाबदारांवर कारवाई निश्चित करण्याची मागणी करण्यात येईल असा इशारा खा.लंके यांनी दिला आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post