आई बाप समजावून घेताना विद्यार्थी व माता भगिनींना अश्रू अनावर ; कर्मवीर जयंतीनिमित्त सारोळा विद्यालयात प्रा.वसंत हंकारे यांचे व्याख्यान



माय नगर वेब टीम

अहिल्यानगर - रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंती निमित्त सारोळा कासार (ता.नगर) येथील कर्मवीर विद्यालयाच्या ४ मजली नूतन इमारती च्या प्रांगणात समाज प्रबोधनकार प्रा.वसंत हंकारे यांचे आई बाप समजावून घेताना या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या व्याख्यानात विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच कार्यक्रमासाठी आलेल्या महिलांना अश्रू अनावर झाले. काही मुली तर धाय मोकलून रडताना दिसून आल्या. आम्ही आमच्या आई वडिलांना आता यापुढे माघारी बोलणार नाही, त्रास देणार नाही असे अनेक विद्यार्थ्यांनी रडत रडत जाहीर पणे सांगितले. त्यामुळे संपूर्ण वातावरण भावनिक झाले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत च्या मॅनेजिंग कौन्सिल सदस्या मीनाताई जगधने होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी अशोक कडूस, मुंबई येथे कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश धामणे, निवृत्त प्राचार्य विश्वासराव काळे, सरपंच आरती कडूस, रवींद्र कडूस, संजय काळे यांच्या सह गावातील ग्रामपंचायत, सोसायटीचे पदाधिकारी, माजी विद्यार्थी ग्रामस्थ उपस्थित होते. प्राचार्य संपतराव काळे यांनी प्रास्ताविकात विद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. पर्यवेक्षक प्रशांत खंडागळे यांनी अहवाल वाचन केले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच कुस्ती स्पर्धेत यश मिळविणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. 

मीनाताई जगधने म्हणाल्या रयत ही माणूस घडविणारी प्रयोग शाळा आहे. त्यामुळे आता आधुनिक युगात विद्यार्थी घडविण्यासाठी शिक्षकांनी एआय तंत्रज्ञान आत्मसात करावे, विद्यार्थ्यांसाठी स्पोकन इंग्लिश सुरु करावे असे आवाहन केले. 

यावेळी बोलताना प्रा. वसंत हंकारे म्हणाले आपल्या आई-बापाला शेवटच्या श्वासापर्यंत जीव लावा, त्यांच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा, कारण आई-बापाचा श्वास निघून गेला तर भिंतीवरच्या फोटोतील आई-बाप कधीच तुम्हाला जीव लावायला येणार नाही याची जाणीव ठेवा.मुला-मुलींच्या आयुष्यात फक्त एकच देव आहे, तो म्हणजे आपला बाप आणि एकच देवी आहे, ती म्हणजे आपली आई. आपल्या आई-बापाला समजून घेण्याची वेळ आली आहे. आपल्या एखाद्या कृत्याने आई-बापाची मान खाली जाईल असे कृत्य आपल्या हातून घडणार नाही याची काळजी घेण्याचे सांगत त्यांना लाचार करू नका, त्यांचे नाव रोशन करण्यासाठी चांगले संस्कार मनाशी बाळगा, असे आवाहन त्यांनी विद्यार्थिनींना व विद्यार्थ्यांना केले.

तुम्ही आयपीएलचे रन मोजतात, त्यांचा हिशेब ठेवतात, ज्या आई-बापाने आपल्याला जन्म दिला, मोठे केले, अंगा-खांद्यावर खेळवले, त्या बापाने आपल्यासाठी किती रन काढले आहे. याचा हिशेब तुम्ही कधी करणार? कारण आज हिशेब करण्याची वेळ आलेली आहे. तो तुम्हाला करावाच लागेल, असे विद्यार्थ्यांना त्यांनी बजावून सांगितले. भविष्यात डॉक्टर, इंजिनिअर, वकील झालात आणि लाखो रुपये कमवून ठेवले मात्र ते पाहण्यासाठी जर आई-बाप नसतील तर तुम्हाला त्या कमावलेल्या पैशांचा उपयोग होणार काय? असा सवाल त्यांनी विद्यार्थ्यांना केला.

आई-बाबांनी लहानपणी आपल्यासाठी काय केले आहे, हे तुम्हाला चांगले माहिती आहे, लहानपणी आपल्याला आई-बाप कळत होते, आता मात्र आम्ही कॉलेजला जायला लागलो, आम्हाला बंधनात तुम्ही ठेवायला लागले, असा तुमचा समज झाला आहे, त्यामुळे मम्मी-पप्पा तुम्ही आम्हाला आता आवडत नाही, आय हेट यू, मम्मी-पप्पा अशी वाक्य मुलांच्या तोंडून येऊ लागली आहे. पण असे व्याख्यान तुमच्यासाठी परिवर्तनाचे वादळ घेऊन आले आहे. परत एकदा तुम्हाला तुमचे हरवलेले आई-बाप यातून नक्की मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा आशावाद डॉ. हंकारे यांनी व्यक्त केला.

सूत्रसंचालन प्रा.सुरेखा वाघ व प्रा.दादासाहेब भालसिंग यांनी केले. तर आभार शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश गट यांनी मानले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post