माय नगर वेब टीम
अहिल्यानगर – अकोले तालुक्यातील निळवंडे धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्यास धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सोडण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. नदीपात्र व जलाशय परिसरात कोणतेही साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. प्रशासकीय यंत्रणांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, तसेच नागरिकांनी सुरक्षिततेस प्राधान्य द्यावे, असे आवाहन उर्ध्व प्रवरा धरण विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांनी केले आहे.
प्रादेशिक हवामान विभागाच्या अंदाजानुसार दि. २६ ते ३० सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात मोठ्या ते अतिमोठ्या प्रमाणात वादळी वा-यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
त्या अनुषंगाने विसर्गात टप्प्याटप्याने वाढ होण्याची शक्यता असल्याने धरणाच्या खालील परिसरातील महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायती क्षेत्रांमध्ये नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नवरात्री उत्सव पार्श्वभूमीवर दि. २ ऑक्टोबर रोजी घट विसर्जनासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक नदी, धरण व जलाशय परिसराकडे जातात. प्रवाही पाण्याचा वेग व खोली लक्षात न आल्यास जिवितहानी होऊ शकते, असेही कळविण्यात आले आहे.
Post a Comment