माय नगर वेब टीम
Parakala Prabhakar Big Claim on Vidhan Sabha Result: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होताच त्याचं विश्लेषण सुरू झालं. सत्ताधारी वर्गाकडून हा मतदारांचा स्पष्ट कौल असल्याचं सांगितलं जात असताना विरोधकांकडून मात्र ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप केला जात आहे. त्यात आता केंद्रीय अर्थमंत्री व भाजपाच्या एक प्रभावी नेत्या निर्मला सीतारमण यांचे पती व अर्थतज्ज्ञ परकला प्रभाकर यांचा समावेश झाला असून त्यांनी मतांच्या टक्केवारीचं गणितच आपल्या दाव्याच्या पुष्टीसाठी मांडलं आहे. त्यानुसार मतदानाच्या दिवशी व मतमोजणीच्या आधीही मतांच्या टक्केवारीत झालेल्या वाढीवर त्यांनी बोट ठेवलं आहे.
परकला प्रभाकर यांनी द वायरला दिलेल्या मुलाखतीमध्ये मतदानाच्या टक्केवारीच्या याच मुद्द्यावर सविस्तर भाष्य केलं आहे. प्रसिद्ध मुलाखतकार करण थापर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालांबाबत त्यांना विचारणा केली असता त्यावर परकला प्रभाकर यांनी परखड भूमिका मांडली.
५० तासांत ७६ लाख मतांची नव्याने भर पडली?
“मतदानाच्या दिवशी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत महाराष्ट्रात मतदानाची टक्केवारी ५८.२२ टक्के होती. ही जवळपास ५ कोटी ६४ लाख ८८ हजार ०२४ मतं होतात. त्या दिवशी रात्री ११.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवाऱी थेट ६५.०२ टक्क्यांवर पोहोचली. हा आकडा जवळपास ६ कोटी ३० लाख ८५ हजार ७३२ इतका आहे. त्यामुळे २० नोव्हेंबरला संध्याकाळी ५ ते रात्री ११.३० यादरम्यान मतांच्या एकूण संख्येत तब्बल ६५ लाख ९७ हजार ७०८ मतांची वाढ झाली. एवढंच नाही, तर प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होण्याच्या आधी एकूण मतांमध्ये ९ लाख ९९ हजार ३५९ मतांची भर पडल्याचं सांगण्यात आलं”, असं परकला प्रभाकर म्हणाले.
“त्यामुळे एकंदरीतच २० तारखेला संध्याकाळी पाच वाजेपासून रात्री ११.३० पर्यंत आणि मतमोजणीच्या जवळपास १२ तास आधी अशी सगळी मिळून एकूण मतसंख्येत ७५ लाख ९७ हजार ०६७ इतकी वाढ झाली. तुम्ही आजपर्यंत झालेल्या निवडणुकांची माहिती घेतली, तर असं कधीच झालेलं नाही की निवडणूक आयोगानं ५ वाजता जुजबी आकडा दिला आणि काही तासांनी अंतिम मतदानाची आकडेवारी दिली”, असा दावा प्रभाकर यांनी केला आहे.
दरम्यान, शेवटच्या काही वेळात वाढलेल्या मतांच्या आकडेवारीसाठी संध्याकाळी ६ वाजेच्या आत (मतदानाची मुदत) रांगेत उभे राहिलेल्या मतदारांना नंतर मतदान करण्याची मुभा देण्यात आली म्हणून आकडा वाढल्याचा दावा केला जात आहे. पण त्यावरही परकला प्रभाकर यांनी आक्षेप घेतला आहे.
“निवडणुकांचा इतिहास पाहिला तर निवडणूक आयोगानं दिलेली मतदानाच्या प्रमाणाची प्राथमिक आकडेवारी आणि अंतिम आकडेवारी यात १ टक्क्यांपेक्षा जास्त फरक कधी झालेला नाही. पण यंदा महाराष्ट्राच्या निकालांमध्ये आपल्याला या दोन आकडेवारींमध्ये तब्बल ७.८३ टक्क्यांचा फरक दिसतोय. मतांची संख्याही तब्बल ७६ लाखांनी वाढली आहे”, असा मुद्दा परकला प्रभाकर यांनी यावेळी उपस्थित केला.
Post a Comment