माय नगर वेब टीम
मुंबई – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल नुकतेच जाहीर करण्यात आले. राज्यात घडलेल्या राजकीय उलथापालथीनंतर लोकसभा निवडणुकांमध्ये जनतेने आपले वजन महाविकास आघाडीच्या पारड्यात टाकले होते. विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र महायुतीने बाजी पलटवली असून प्रचंड बहुमतासह सत्तेच्या चाव्या राखल्या आहेत. महायुतीचे हे घवघवीत यश आश्चर्यकारक ठरलं आहे.
विधानसभेत महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर आता काँग्रेस पक्षाने मतदानाच्या आकडेवारीवर गंभीर शंका उपस्थित केल्या आहेत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषदेत, ७६ लाख मतांची आकडेवारी सादर करून निवडणूक आयोगावर थेट आरोप केले आहेत.
नाना पटोले यांचे गंभीर आरोप
“मतदान प्रक्रियेत ७.५ टक्क्यांची वाढ कशी झाली, याचं उत्तर आयोगाने द्यायला हवं. मतदान सायंकाळी ५.३० पर्यंत ५८.२२ टक्के झालं होतं. मग उशिरा रात्रीपर्यंत मतदारांची रांग लागली होती का? आयोगाकडे याबाबतचे फोटो आणि व्हिडीओ आहेत का? हे स्पष्ट करावं,” असं थेट आव्हान पटोले यांनी निवडणूक आयोगाला दिलं आहे.
पटोले यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत पारदर्शकतेचा अभाव असल्याचं म्हटलं आहे. “निवडणूक आयोगाने मतदानानंतर नेहमीप्रमाणे पत्रकार परिषद घेऊन लोकांना माहिती दिली नाही. ही परंपरा खंडित का झाली?” असा प्रश्नही त्यांनी यावेळी विचारला आहे. “निवडणूक आयोगाने जनतेच्या शंकांचं निरसन करायला हवं. आम्ही यासाठी न्यायालयात जाऊन चौकशीची मागणी करू,” असं देखील पटोले यांनी स्पष्ट केलं.
मतदानाच्या आकडेवारीतील विसंगतीमुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आता आयोग या आरोपांवर काय स्पष्टीकरण देतो, याकडे लक्ष लागलं आहे.
Post a Comment