नगर-सोलापूर महामार्गावर 'नाजूक' व्यवसायाला परवानगी आहे का?; नागरिक म्हणतायेत आता बस्सं...



नगर तालुका व श्रीगोंदा पोलिस ठाण्याच्या कारभाऱ्यांना ग्रामस्थांचा संतप्त सवाल | एसपींच्या आदेशाला नगर-श्रीगोंदा पोलिसांकडूनच केराची टोपली!
माय नगर वेब टीम

अहमदनगर - जगावं की मरावं असा एकच सवाल हा अभिनेता नाना पाटेकर यांचा उद्विग्न डायलॉन सर्वांनीच एकला असेल. असाच सवाल नगर-सोलापूर रोडवरील ग्रामस्थ करतायेत. त्याला कारणही तसंच आहे. नगर- सोलापूर रोडवर खुलेआमपणे पोलिसांच्या अर्थपूर्ण आशिर्वादाने सुरु असलेले नाजूक व्यवसाय. नाजूक व्यवसाय करणाऱ्यांसोबत पोलिसांचे अर्थपूर्ण लागेबांधे असल्याने त्या धंद्यांवर कितीही तक्रारी केल्या तरी कारवाई होत नाही हे विशेष. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी पोलिस ठाण्यांच्या कारभाऱ्यांना हद्दतील अवैध धंदे बंद करण्याचे सुचित करुनही नगर तालुक्यातील गावागावात तसेच नगर-सोलापूर रोडवर नाजूक व्यवसायासह अवैध धंद्यांचा सध्या सुळसुळाट सुरु असल्याचे वास्तव समोर आले आहे.
नगर सोलापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणात खुलेआम नाजूक व्यवसाय सुरु आहेत. पोलिसांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे. नगर-सोलापूर महामार्गावर अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीत नाजूक व्यवसायाचे जाळे पसरलेले आहे. हा व्यवसाय या रस्त्यावरील हॉटेल अन लॉजवर सुरु आहे. खुलेआम नाजूक व्यवसायाचा धुमाकूळ सुरु असूनही पोलिस मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत. याच परिसरात शाळा, महाविद्यालये आहेत. हे धंदे पोलिसांच्या चिरीमिरीमुळे बंद होत नसल्याने पालक वर्ग चिंतेत सापडला आहे. हॉटेल, लॉजिंगच्या नावाखाली सुरु असलेल्या नाजूक व्यवसायावर आळा घालण्यासाठी पोलिसांकडून कठोर भूमिका घेण्याची गरज आहे. पोलिसांनीही दिखाव्यापुरती कारवाई न करता तेथील नाजूक व्यवसाय कायम स्वरुपी बंद कसे होतील यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे.
खुलेआमपणे सुरु असलेल्या नाजूक व्यवसायावर पोलिसांचाच आशिर्वाद असल्याचा आरोप देखील महामार्गालगत राहणाऱ्या ग्रामस्थांकडून केला जात आहे. हे व्यवसाय कायमस्वरुपी बंद करुन करावेत अशी मागणी रुईछत्तीसी आणि नगर-सोलापूर महामार्गावरील टोलनाका परिसरातील नागरिक करीत आहेत. स्थानिक नागरिकांनी तक्रारी करुनही पोलिसांकडून त्या व्यावसायिकांवर कारवाई होत नाही. एसपी साहेबांनाच नागरिकांच्या या महत्वाच्या मागणीकडे लक्ष घालावे लागणार आहे हे ही तितकेच खरे.

नाशिकच्या पथकाची सोलापूर रोडवर कारवाई पण...

गेल्या काही दिवसांपूवी नगर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी नाशिकच्या पथकाने येऊन कारवाई केली. त्यात सोलापूर रोडवरील नाजूक व्यवसायावर रेड टाकली. परंतू तालुक्याच्या हद्दीत सुरु असलेल्या अवैध धंद्यांचा साधा मागसूसही पोलिसांना लागला नाही. हे विशेष. तालुक्यातील अवैध धंदे बंद होत नसतील तर पोलिस ठाण्यांच्या कारभाऱ्यांवर आता एसपी काय कारवाई करणार?, संबंधित बीट सांभाळणाऱ्या पोलिसांवर निलंबनाची कारवाई का केली जात नाही असा सवाल नागरिक करत आहेत एसपींचा नगर तालुका व श्रीगोंदा पोलिस ठाण्यावरील कंट्रोल संपलाय का कारभारी एसपींच्या आदेशालाच जुमानत नाहीत का? नाजूक अवैध धंद्यात पोलिसांचीच पार्टशीप तर नाही ना? असा रोकडा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.

नगर-श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे कारभार मुडदे पडण्याची वाट पहातायेत का?
अवैध धंदे वाढली की गुन्हेगारीही वाढते हे सर्वश्रृत आहे. पोलिस प्रशासनातील भ्रष्ट कारभाराला आळा घालण्यासाठी खासदार निलेश लंके यांनी स्वतः जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण केले. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनीही लागलीच पोलिस ठाण्यांच्या कारभाऱ्यांना अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले. काही दिवस पोलिसांनीही थातूरमातूर कारवाईही केली. परंतू काही दिवसांतच अवैध धंदे जैसे थे च सुरु झाले. अवैध धंदे चालकांची पोलिसांसोबतच उठबस असल्याने त्यांची परिसरात दहशत आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात कोणीही जात नाही. विरोधात तक्रारी केल्यास थेट संबंधितावर हल्ला करण्याचेही प्रकार घडले आहेत. अवैध धंद्यांकडे पोलिसही बघ्याची भूमिका घेत असून नगर-श्रीगोंदा पोलिस ठाण्याचे कारभारी मुडदे पडण्याची वाट पहातायेत का? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post