काँग्रेस, सेनेला फसवणारांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत! ; लंके यांचा मंत्री विखेंवर निशाना



माय अहमदनगर वेब टीम 

पाथर्डी :अजित पवारांना फसवलं ते जनतेला का फसवणार नाही अशी टीका करणाऱ्या मंत्री राधाकृष्ण विखे यांनी काँग्रेस, शिवसेनेला फसविले. त्यांनी निष्ठेच्या गप्पा मारू नयेत असे प्रत्युत्तर आ नीलेश लंके यांनी करंजी येथे झालेल्या सभेत शुक्रवारी दिले. 

      लंके यांची नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी जनसंवाद यात्रा सुरू असून पाचव्या दिवशी करंजी येथे झालेल्या सभेत लंके यांनी विखे पिता-पुत्रांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे, माजी जि प सदस्य उषाताई कराळे, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवशंकर राजळे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख रफिक शेख, सरपंच नसीम शेख, उपसरपंच सुनील अकोलकर, युवानेते अमोल वाघ, सरपंच राजेंद्र पाठक, भीमराज सोनवणे, अँड सतीश पालवे, विष्णू पालवे, तिसगावचे सरपंच इलियास शेख, माजी चेअरमन बाळासाहेब लवांडे, सरपंच नितीन लोमटे, ग्रामपंचायत सदस्य गणेश अकोलकर, अंबादास नजन, अभयकुमार गुगळे सुनील अकोलकर, बाळासाहेब अकोलकर, भाऊसाहेब अकोलकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.लंके म्हणाले, काँग्रेस पक्षाने तुमच्या कुटूंबाला भरभरून दिले. राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यानंतर तुम्ही काँग्रेसला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनकडून वडील स्व. बाळासाहेब विखे पाटील यांना केंद्रामध्ये अवजड उद्योग मंत्रीपद तर तुम्हाला राज्यात कृषीमंत्रीपद देण्यात आले. शिवसेनेची सत्ता गेल्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी करून तुम्ही पुन्हा काँग्रेसवासी झाले. काँग्रेसमध्ये गेल्यानंतर विरोधी पक्षनेतेपदावर तुम्ही हक्क सांगितला व ते पद मिळविले. विधीमंडळ कार्यपध्दतीत विरोधी पक्षनेता हे पद महत्वाचे असताना तुम्ही पुन्हा काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपावासी झालात आणि संपूर्ण राज्याची फसवणूक करीत पुन्हा काँग्रेस पक्षाशी गद्दारी केली. त्यामुळे माझ्या पक्ष बदलाच्या भुमिकेवर टीका करण्याचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही असे लंके यांनी निक्षून सांगितले.महाविकास आघाडी सरकारच्या अडीच वर्षांच्या कामाचा तुम्ही मला हिशोब मागता आहात. तुमचेच कार्यकर्ते हवाला देऊन मी किती निधी आणलाय हे सांगत आहेत हे लक्षात ठेवा.मी सांगण्याची गरज नाही. आपण गेली पन्नास वर्षे सत्तेत आहात, जिल्हयात एक तरी एमआयडीसी आणली का ? आपले वडील केंद्रात अवजड उद्योगमंत्री होते, एखादं कुक्कुटपालन तरी आणलं का नगर जिल्हयासाठी ? मी हंगे गावाचा सरपंच झाल्यापासून एमआयडीसीमध्ये उद्योगांची भरभराट झाली. परदेशी कंपन्या सुप्यामध्ये येऊ लागल्या. शेजारच्या रांजणगाव गणपती, चाकण येथील वसाहतींपेक्षाही सुपा एमआयडीसीमधील उद्योगांची वाढ मोठया संख्येने होत असून हेच तुम्हाला देखवत नाही त्यामुळे तुम्ही व्यक्तीगत द्वेशातून टिका करू लागले असल्याचे लंके यांनी ठणकावून सांगितले.आमच्यावर दहशत, गुंडगिरीचे आरोप केले जातात. खरं तर एकदा तुमच्या राहाता तालुक्यात जाऊन सर्वसामान्य जनतेचा कानोसा घ्या. त्यांना विचारा सत्तेचा गैरवापर करून खोटे नाटे गुन्हे दाखल करण्यास कसे भाग पाडले जात आहे. सोशल मीडियावर स्टेटस ठेवले तरी आपण गुन्हे दाखल करता. सत्तेचा किती गैरवापर कराल असा सवाल लंके यांनी केला. 


लंके म्हणाले, एमआयडीसी व भंगाराबाबत आपण आरोप केले. भंगाराचा व्यवसाय कोणाचा आहे ? आम्हाला तर फिरून भंगार गोळा करावेच लागेल. आपण राजपुत्र आहोत, तरीही राहुरी कारखान्याचे ५० कोटीहून अधिक रूपयांचे भंगार कोणी विकले ? याचा अगोदर तुम्ही हिशेब द्या. भंगार माफीया सुजय विखे आहेत. तुमचं असं झालंय की आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पहायचं उचकून. राहुरी कारखान्याचे वाटोळे कोणी केले ? गणेश सहकारी साखर कारखाना आपल्या ताब्यातून का गेला, प्रवरा साखर कारखान्यातील१९१ कोटींचा घोटाळा कोणी केला ? देशातील पहिला साखर कारखाना असूनही तो अजून का कर्जबाजारी आहे ? अशा प्रश्‍नांची सरबत्ती करीत विकासाचा एकही मुद्दा नसल्याने विखे-पिता पुत्र वैयक्तीक पातळीवर घसरू लागल्याचे लंके म्हणाले. 


 तिसगावकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न

जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून आमदार निलेश लंके सकाळी दहा वाजता तिसगावमध्ये आले या ठिकाणी चौकसभा घेण्याचे कोणते नियोजन नव्हते केवळ व्यापाऱ्यांच्या व स्थानिक नागरिकांच्या भेटीगाठी घ्यायच्या होत्या. त्या भेटीगाठी अतिशय उत्साहाच्या वातावरणात झाल्या. लोकांचा देखील मोठा प्रतिसाद मिळाला परंतु काही विघ्नसंतोषी लोकांनी सोशल मीडियावर चुकीचे मेसेज पाठवून तिसगावकरांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला.त्यामुळे तिसगावकर कोणाच्या पाठीशी आहेत हे मतपेटीतून टाकून देऊ.

 मुनिफा शेख सरपंच तिसगाव.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post