नारायणची तुफानी खेळी, विराट' खेळी व्यर्थ; कोलकाताचा धमाकेदार विजय



स्पोर्ट डेस्क 

सुनील नारायणची तुफानी खेळी, दुखापतीशी झुंज देत व्यंकटेशनं केलेल्या झुंझार खेळीच्या जोरावर कोलकाता नाइट रायडर्सनं रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूवर सहज विजय मिळवला. फलंदाजीत अपयशी ठरलेला फाफ डू प्लेसिस कर्णधार म्हणूनही अपयशी ठरल्याचं दिसून आलं.


एम चिन्नास्वामी मैदानात आज, शुक्रवारी कोलकाता विरुद्ध बेंगळुरू  सामना झाला. कोलकातानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. हा निर्णय कोलकाताच्या पथ्यावर पडला. सलामीवीर फाफ डू प्लेसिस याला हरशित राणानं अवघ्या ८ धावांवर बाद केलं. मात्र, दुसऱ्या बाजूला विराट कोहली नडला. विराटनं शेवटपर्यंत किल्ला लढवला. त्याला कॅमरून ग्रीन आणि ग्लेन मॅक्सवेलनं चांगली साथ दिली. या दोघांनी अनुक्रमे ३३ धावा आणि २८ धावा केल्या. मात्र हे दोघेही बाद झाल्यानंतर आलेल्या रजत पाटीदार आणि अनुज रावत यांनी घोर निराशा केली. दोघेही अनुक्रमे तीन धावा करून तंबूत परतले.


एका बाजूला विराट कोहली मैदानात टिच्चून उभा होता. त्यानं ५९ चेंडूंत ८३ धावांची तुफानी खेळी केली. यात चार षटकार आणि चार चौकारांचा समावेश होता. दिनेश कार्तिकनं त्याला अखेरच्या षटकांमध्ये चांगली साथ दिली. कार्तिकनं अवघ्या ८ चेंडूंत २० धावा ठोकल्या. त्यात तीन षटकारांचा समावेश होता. बेंगळुरूनं २० षटकांत ६ बाद १८२ धावा केल्या.


बेंगळुरूनं दिलेलं १८३ धावांचं तगडं आव्हान घेऊन कोलकाताचे सलामीवीर मैदानात उतरले. कोलकातानं सुनील नारायणच्या रुपानं खेळलेला डाव पथ्यावर पडला. त्यानं संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. अवघ्या २२ चेंडूंत ४७ धावांची आतषबाजी त्यानं केली. त्यात पाच उत्तुंग षटकारांचा समावेश होता. तर दोन चौकारही ठोकले. सॉल्टनं संघाच्या धावसंख्येला मीठाप्रमाणेच चव आणली. २० चेंडूंत त्यानं ३० धावांची खेळी केली. तर त्यानंतर आलेल्या व्यंकटेश अय्यरनं ३० चेंडूंत ५० धावा कुटल्या आणि कोलकाताला विजयी दिशेनं वाटचाल करून दिली.


बेंगळुरूनं १८३ धावांचं तगडं आव्हान कोलकातासमोर ठेवलं होतं. मात्र, बेंगळुरूचे गोलंदाज डिफेंड करण्यात अपयशी ठरले. कर्णधार म्हणून फलंदाजीच्या आघाडीवर अपयशी ठरलेला फाफ डू प्लेसिस रणनीतीच्या आघाडीवरही सपशेल फेल ठरला. क्षेत्ररक्षणाबरोबरच रणनीती ठरवण्यास तो अपयशी ठरला. नारायण आणि सॉल्ट वेगवान गोलंदाजांना चोपत असताना पॉवर प्लेमधल्या सहा षटकांपैकी एकही षटक त्यानं फिरकीपटूला दिलं नाही. त्यामुळं पॉवर प्लेमध्येच या सलामीच्या जोडीनं विजय निश्चित केला. १७ व्या षटकांतच बेंगळुरूनं लक्ष्य गाठलं.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post