आता नगरमध्ये 'पे अँड पार्क', 'या' 36 ठिकाणची मंजुरीमाय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर-  महापालिका प्रशासनाने शहरातील ३६ रस्ते व जागांवर 'पे अँड पार्क' मंजूर करत त्यासाठी नाशिक येथील खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. मागील वर्षी महासभेत या पार्कींग धोरणाला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार निविदा काढून खासगी संस्थेला कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना आता शहरातील प्रमुख रस्त्यांवर व निश्चित केलेल्या खुल्या जागांवर पार्कींगसाठी शुल्क द्यावे लागणार आहे. दुचाकीसाठी प्रतितास ५ रुपये व चारचाकी वाहनांसाठी प्रतितास १० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. दरम्यान, या व्यतिरिक्त जीएसटी अतिरिक्त द्यावा लागणार आहे.


वाहतूक व्यवस्थेअभावी निर्माण होणारी समस्या भविष्यात आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने पार्कीझ मोबेलिटी प्रा.लि. या खाजगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करून नो पाकींग झोन, नो हॉकर्स झोन, सम विषम सशुल्क पार्किंग, एकेरी वाहतूक, महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे अँड पार्क आदींच्या नियोजनाचा प्रकल्प अहवाल तयार केला होता. महासभेत मंजुरी देण्यात आल्यावर निविदा प्रक्रिया होऊन खासगी संस्थेला पार्कींग शुल्क वसुलीचा ठेका देण्यात आला आहे. पाच वर्षांसाठी हा ठेका देण्यात आला असून, यातून महापालिकेला पाच वर्षात २१.७५ लक्ष रुपये रॉयल्टी मिळणार आहे. 


शहरात लक्ष्मी भाऊराव पाटील विद्यालय, बेलदार गल्ली, चांद सुलताना विद्यालय समोरील रस्ता, गाडगीळ पटांगण, गांधी मैदान, मंगल गेट मटन मार्केट समोरील जागा, नेहरू मार्केट मोकळी जागा, वस्तू संग्राहलय, नोबल हॉस्पिटल लगतचा रस्ता, जुने सिव्हील हॉस्पिटल, लाल टाकीरस्ता अप्पू हत्ती चौक ते स्वास्थ्य हॉस्पिटल ते झेडपी क्वार्टरलगत, पोलिस लाईनलगत, बालिकाश्रम रस्ता नीलक्रांती चौक ते नायरा पेट्रोल पंप, सातभाई मळा, सावेडी जॉगिंग ट्रॅक १, सावेडी जॉगिंग ट्रॅक २, मिसगर विद्यालयमागे, वाडिया पार्क मधील दक्षिणेकडील गेट जवळील जागा, एकविरा चौक ते पारिजात चौक रस्ता, इमारत कंपनी, अमरधाम पश्चिमेकडील कम्पौंड जवळील जागा, मानकर गल्ली, नीलक्रांती चौक ते चौपाटी कारंजा रस्ता, पांजरपोळ मोकळी जागा (मार्केटयार्ड चौक), पाईपलाईन रस्ता, पुणे बस स्थानकाजवळ, नेताजी सुभाषचंद्र चौक ते नवी पेठ शहर सहकारी बँकपर्यंत, कोठी रस्ता ते यश पलेस हॉटेल, भिस्तबाग चौक ते टीव्ही सेंटर हडको चौकापर्यंत, प्रोफेसर चौक ते प्रेमदान हॉटेल चौक, नवीन कलेक्टर ऑफिस रोड, सेंट आण्णा चर्च रोड, बंगाल चौकी, चायना मार्केट, सहकार सभागृह रोड, सावित्रीबाई फुले संकुल (आकाशवाणी केंद्राशेजारी) या ठिकाणी सशुल्क वाहनतळ मंजूर केले आहेत. 


महापालिकेने दुचाकीसाठी ५ रुपये, चारचाकीसाठी १० रुपये, टेम्पोसाठी २५ रुपये, मिनी बस ५० रुपये, अवजड वाहने (ट्रक, बस, टुरिस्ट बस) - १२० रुपये, खासगी बस (१५ मीटर लांब) - १५० रुपये शुल्क निश्चित केले आहे. या व्यतिरिक्त जीएसटी द्यावा लागणार आहे. तसेच, नो पार्किंग व नो हॉकर्स झोनमध्ये पार्कींग केल्यास दुचाकी (टोविंग) ७४२ रुपये, दुचाकी (क्लॅंपिंग) ५०० रुपये, चारचाकी (टोविंग) ९८४ रुपये, चारचाकी (क्लॅंपिंग) ७४२ रुपये असे शुल्क (जीएसटी अतिरिक्त) मंजूर करण्यात आले आहे. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर याची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post