चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, आता फक्त... ; या गावात पुढाऱ्यांना नो एन्ट्रीमाय नगर वेब टीम 

अहमदनगर - मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी राज्यभरात ठिकठिकाणी विविध स्वरूपाची आंदोलने सुरू आहेत. आता या आंदोलनाला वेगळे वळण मिळाले असून त्यांचा फटका राजकीय नेत्यांना बसला आहे. राजकीय नेत्यांना थेट गावबंदी करण्यात येत असून त्याचे लोण नगर जिल्ह्यात आले असून जिल्ह्यात आजपर्यंत 32 गावांनी राजकीय नेत्यांना गावाबंदी केल्याचे फलक लावले आहे. आगामी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही काही गावांकडून इशारा देण्यात आला आहे.मराठा आरक्षणाच्या प्रश्‍नावर सरकारने 40 दिवसांची मुदत घेऊनही प्रत्यक्षात आरक्षणाचा निर्णय न घेतल्यामुळे मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा पेटले आहे. जिल्ह्यात 32 गावांमध्ये सर्व मंत्री व आमदार-खासदारांसह राजकीय नेत्यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मराठा आरक्षण प्रश्‍नावर सरकारने मुदत घेऊनही काहीच निर्णय न घेतल्याने मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी गावात पुन्हा आमरण उपोषण सुरू केल्यानंतर त्यांना पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यात बहुतांशी तालुक्यात सकल मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू केले.सकल मराठा समाजातर्फे सर्वच राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकार्‍यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्या आशयाचा फलक मुख्य चौकात लावला आहे. तसेच, मराठा आरक्षण मिळेपर्यंत आगामी काळातील सर्व निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची त्या फलकावर टीपही लिहिली आहे.

‘चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा आरक्षण एकच आमचं लक्ष्य’ मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणत्याही राजकीय पक्ष आणि नेत्यास गावात प्रवेश नाही. त्यामुळे आपली मान मर्यादा राखून गावात प्रवेश करावा. तसेच, कोणत्याही राजकीय पक्षाचे गावात बॅनर लावू नये, असा मजकूर असलेले भलेमोठे फलक मुख्य चौकाचौकात लावले आहेत. ते लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. जिल्ह्यात सध्या सर्वाधिक शेवगाव व जामखेड तालुक्यात प्रत्येक आठ गावांनी गावबंदीचे फलक लावले आहे.गावात येणाऱ्या आमदार, खासदारांना मराठा समाजाच्या तीव्र असंतोशास सामोरे जावे लागत आहे. मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आमदार, खासदार, नगरसेवक, सरपंच राजीनामे देत आहेत. तसेच नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन, विद्यमान संचालक महेश चोभे यांनी मराठा आरक्षणासाठी आपल्या सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. आता गावागावातून मराठा आरक्षणास पाठिंबा मिळत आहे.


जिल्ह्यात गावबंदी करण्यात आलेले तालुकानिहाय गावे पुढील प्रमाणे आहे. शेवगाव- रांजणा, भावीनिमगाव, मठाचीवाडी, मजलेशहर, गदेवाडी, सुलतानपूर बुद्रक, अमरापूर, आखेगाव. नेवासा- उस्थळ दुमला. पारनेर- देसवडे. नगर तालुका- भातोडी पारगाव, वाळकी, खडकी, सांडवे, अकोले- चैतन्यपूर. पाथर्डी- मिरी, चितळी, पाडळी, श्रीरामपूर- खंडाळा. जामखेड- पाटोदा, सारोळा, गोडवी, कुसळगाव, पिंपरखेड, काटेवाडी, जमादारवाडी, घोडेगाव. कर्जत- दुरगाव, शिपोरा, बाभुळगाव, मानेवाडी, जुने शिपोरा. कोपरगाव- नाटेगाव, करंजी. संगमनेर- वडगाव पान.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post