माय नगर वेब टीम
अहमदनगर
नगर बँक खात्याचा प्रॉब्लेम ऑनलाईन सोडविण्याच्या बहाण्याने मोबाईलवर लिंक पाठवून त्यात भरलेल्या माहितीच्या आधारे एका व्यावसायिकाच्या बँक खात्यातून सायबर गुन्हेगाराने २ लाख ६१ हजार ६४८ रूपये काढून घेत त्यांची फसवणुक केली आहे. याबाबत बुधवारी (दि. १८) दुपारी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी भिकाजी कर्डिले (वय ४३, रा. जखणगाव, ता. नगर) असे फसवणुक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. कर्डिले यांचा कुक्कुटपालनाचा व्यवसाय असून त्यांचे आयसीआयसीआय बँकेत खाते आहे. त्यांना
१३ ऑक्टोबर रोजी दुपारी एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवर फोन करून 'मी आयसीआयसीआय बँकेतून बोलत आहे, तुमच्या बँक खात्याचा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तो ऑनलाईन सोडविण्यासाठी तुमच्या व्हॉटस अॅप वर एक लिंक पाठवतो, त्यात तुमची सर्व माहिती व्यवस्थित भरा', असे सांगितले. फिर्यादी कर्डिले यांचा त्या व्यक्तीवर विश्वास बसल्याने त्यांनी लिंक ओपन करून सर्व माहिती भरली. त्यानंतर बँकेच्या डेबिट कार्डचा फोटोही पाठविला. त्यानंतर त्या अनोळखी व्यक्तीने या माहितीचा गैरवापर करत कर्डिले यांच्या बँक खात्यातून लागोपाठ ४ वेळा विविध रकमा काढून घेतल्या. एकूण २ लाख ६१ हजार ६४८
रुपये खात्यातून काढले गेल्याचे मेसेज कर्डिले यांना आल्यावर त्यांनी त्या व्यक्तीला फोन करून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्या व्यक्तीने मोबाईल बंद केला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कर्डिले यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात सायबर गुन्हेगाराविरुद्ध भा.दं.वि. कलम ४२०, ४१७, ४१९ सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) नुसार गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हा वरिष्ठांच्या आदेशानुसार सुपा पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
Post a Comment