'अर्बन' बँक बुडवणाऱ्यांच्या अडचणी वाढल्या, केव्हाही होऊ शकते असे...माय नगर वेब टीम 

 अहमदनगर- बँकींग परवाना रद्द झालेल्या नगर अर्बन बँकेतील संशयास्पद 131 कर्ज प्रकरणाच्या फाईली फॉरेन्सिक ऑडिट करणार्‍या अधिकार्‍यांच्या समक्ष येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पंचनामा करून जप्त केल्या आहेत. सोमवार (दि. 16) व मंगळवार (दि. 17) अशा दोन दिवसात ही कारवाई पूर्ण करण्यात आली आहे. दरम्यान, फॉरेेन्सिक ऑडीट अंतिम टप्प्यात असून त्या अनुषंगाने आवश्यक कर्ज प्रकरणाच्या फाईली बँकेतून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे अर्बन बँक बुडवण्यास कारणीभूत असलेल्या दोषींच्या गळ्यातील कारवाईचा फास आवळण्यास सुरूवात झाल्याचे बोलले जात आहे.

बँकेचे माजी संचालक व बँक बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी 17 फेब्रुवारी 2022 रोजी पोलिसात फिर्याद देऊन 28 कर्ज प्रकरणात सुमारे दीडशे कोटींचा घोटाळा झाल्याचे त्यात म्हटले होते. आर्थिक गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केल्यावर व त्याची व्याप्ती मोठी असल्याचे लक्षात आल्यावर फॉरेन्सिक ऑडीट करण्याचा निर्णय घेतला आहे. ते आता अंतिम टप्प्यात असून या अहवालात नमूद बाबींच्या अनुषंगाने बँकेतील कर्जखात्यांच्या फाईली आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपअधीक्षक कमलाकर जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ताब्यात घेण्यास सोमवारी सुरूवात केली होती. फॉरेन्सिक ऑडीट करणारे चार अधिकारी यावेळी हजर होते. सरकारी पंचासमक्ष या सर्व फाईलींची पडताळणी करण्यात आली. सोमवारी व मंगळवारी अशा दोन दिवस ही पडताळणी पूर्ण करून 131 संशयास्पद फाईली जप्त करण्यात आल्या असल्याचे उपअधीक्षक जाधव यांनी सांगितले.

दरम्यान, या फाईली ताब्यात घेतल्यानंतर फॉरेन्सिक ऑडीट करणारे अधिकार्‍यांकडून याची पडताळणी केली जाणार असून त्यानंतरच फॉरेन्सिक ऑडीट पूर्ण होऊन त्याचा अंतिम अहवाल ते पोलिसांना सादर करणार असल्याचे समजले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post