माय नगर वेब टीम
अहमदाबाद : अखेरच्या पाच चेंडूंत पाच षटकारांची बरसात करत रिंकू सिंग हा केकेआरच्या विजयाचा हिरो ठरला. अखेरच्या षटकात २९ धावांची गरज असताना रिंकू सिंगने पाच षटकार लगावले आणि संघाला भन्नाट विजय मिळवून दिला. गुजरातने केकेआरपुढे २०५ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान केकेआरने तीन विकेट्स राखत पूर्ण केले.
गुजरातच्या २०५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरची सुरुवात चांगली झाली नाही. कारण केकेआरची २ बाद २८ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर मात्र वेंकटेश अय्यर आणि नितीष राणा यांची चांगलीच जोडी जमली. वेंकटेश अय्यरने तर यावेळी गुजरातच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०० धावांची भागीदारी रचली. पण यावेळी गुजरातच्या अल्झारी जोसेफने या दोघांनाही बाद केले आणि सामना गुजरातच्या बाजूने झुकवली. अय्यरने यावेळी ४० चेंडूंत ८३ धावांची खेळी साकारली. पण त्यानंतर रिंकू सिंगने अखेरच्या षटकात पाच षटकार लगावले आणि संघाला अनपेक्षित विजय मिळवून दिला. रशिद खानने या सामन्यात हॅट्ट्रीक घेतली होती, पण ती वाया ठरली. कारण रिंकूने २१ चेंडूंत ४८ धावा करत केकेआरला सामना जिंकवून दिला.
गुजरातच्या संघाला यावेळी धडाकेहाज सुरुवात मिळाली नाही. कारण वृद्धिमान साहा चौथ्याच षटकात बाद झाला. पण त्यानंतर मात्र शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांच्यामध्ये चांगलीच जोडी जमली. या दोघांनी यावेळी संघाचे शतक फलकावर लावले. पण शतक झाल्यावर लगेच गिल बाद झाला आणि त्यामुळे गुजरातला दुसरा धक्का बसला. गिलने यावेळी ३१ चेंडूंत पाच चौकारांच्या जोरावर ३९ धावांची खेळी साकारली. पण गिल बाद झाला असला तरी साई सुदर्शन मात्र भन्नाट फॉर्मात होता आणि त्याने यावेळी आपले अर्धशतक पूर्ण केले. साईने यावेळी ३८ चेंडूंत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर ५३ धावांची दमदार खेळी साकारली. पण साई बाद झाल्यावर शंकरचे वादळ मैदानात आले.
विजय शंकरने यावेळी केकेआरच्या गोलंदाजांची धुलाई केली. विजयने यावेळी दमदार षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण तर केलेच पण संघाला २०० धावांचा टप्पा गाठून देण्याता सिंहाचा वाटा उचलला. विजय शंकरने यावेळी २४ चेंडूंत चार चौकार आणि पाच षटकारांच्या जोरावर नाबाद ६३ धावांची खेळी साकारली. अखेरच्या दोन षटकांत तर त्याने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. त्यामुळे गुजरातच्या संघाला २० षटकांत २०४ धावा करता आल्या.
Post a Comment