सारोळा कासारच्या यात्रोत्सवात यंदा प्रथमच रंगणार निमंत्रितांच्या कुस्त्यांचे मैदान



पारंपारिक आखाड्याऐवजी वजन गटावर होणार कुस्त्या; मल्लांना नावनोंदणीचे आवाहन

माय अहमदनगर वेब टीम 

अहमदनगर - नगर तालुक्यातील सारोळा कासार येथील हिंदू-मुस्लीम व इतर सर्व धर्मियांच्या ऐक्याचे प्रतिक असलेले ग्रामदैवत हजरत निर्गुणशाहवली बाबांचा  वार्षिक यात्रोत्सव (उरुस) रविवारी (दि.२६) साजरा होत आहे. या निमित्ताने गावकऱ्यांनी लोकवर्गणीद्वारे जमा केलेल्या पैशातून सोमवारी (दि.२७) पारंपारिक आखाड्याऐवजी निमंत्रित व नोंदणी केलेल्या मल्लांच्या वजन गटावर कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी मल्लांना नावनोंदणीचे आवाहन करण्यात आले आहे.



सारोळा कासारचा वार्षिक यात्रोत्सव आणि कुस्त्यांचा आखाडा संपूर्ण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. दरवर्षी चैत्र पंचमीला हा यात्रोत्सव साजरा केला जातो. याच्या नियोजनासाठी गावकारभाऱ्यांची बैठक गुढीपाडव्याच्या दिवशी बुधवारी (दि.२२) हजरत निर्गुणशाहवली बाबांच्या दर्ग्यात झाली. या बैठकीस गावातील माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र कडूस, बाजार समितीचे सहसचिव संजय काळे, शिक्षक नेते संजय धामणे, जयप्रकाश पाटील, राजाराम धामणे, तालुका दुध संघाचे चेअरमन गोरक्षनाथ काळे, फकीरतात्या कडूस, तुकाराम कडूस, यांच्यासह ग्रामपंचायत, सोसायटीचे पदाधिकारी, सर्व प्रमुख गावकारभाऱ्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत शनिवारी (दि.२५) रात्री संदल मिरवणूक, रविवारी (दि.२६) मुख्य यात्रोत्सव, सोमवारी (दि.२७) कुस्त्यांचा आखाडा असे नियोजन सर्वानुमते करण्यात आले. सदर यात्रोत्सव गावचा उत्सव असून यामध्ये सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येत तो शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याचे आवाहन यावेळी गावातील ज्येष्ठ नागरिक तसेच पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आले.

सारोळा कासारच्या कुस्ती आखाड्यात दरवर्षी राज्यभरातून नामवंत मल्ल हजेरी लावत असतात.या कुस्ती मल्ल विद्येला प्रोत्साहन देण्यासाठी यावर्षी ग्रामस्थांनी पारंपारिक कुस्ती आखाड्यात बदल करत निमंत्रित व नोंदणी केलेल्या मल्लांच्या वजन गटावर कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मल्लांनी युवामहाराष्ट्र केसरी विष्णू खोसे व यात्रा कमेटीतील सदस्यांशी संपर्क साधून नाव नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.

सारोळा ग्रामस्थांनी या वर्षी प्रथमच आयोजित केलेल्या इनामी कुस्त्यांचे मैदान पाहण्यासाठी कुस्ती शौकीनांनी उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे. गावच्या या सोहळ्यासाठी गावकऱ्यांनी जोरदार तयारी केली आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post