गाव विकासासाठी महत्त्वाची भूमिका ; राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन कडून दखल निंबळकच्या सरपंच प्रियंका लामखडे आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित

 माय अहमदनगर वेब टीम नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक गावच्या सरपंच सौ. प्रियंका अजय लामखडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना बेळगाव येथील राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणाऱ्या आंतरराज्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

     यापूर्वी सरपंच प्रियंका लामखडे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आलेले आहे. शनिवार दि. ८ रोजी बेळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात सौ. लामखडे यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, बांधकाम क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा या राज्यातील नागरिकांना हा पुरस्कार देण्यात येतो.

     पुरस्कार सोहळ्यासाठी कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली, गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी केंद्रीय मंत्री श्रीमती रत्नमाला सावनूर, कोल्हापूरचे माजी महापौर राजू शिंगाडे, खासदार अमरसिंह पाटील, जिल्हा कमांडर अरविंद घट्टी, आमदार निलेश लंके यांच्यासह कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातील भारतीय सैन्यदलातील अधिकारी, सिने कलाकार उपस्थित होते.      निंबळक गावच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध योजना. महिला सरपंच असून देखील सर्वांना सोबत घेत केलेला गाव विकास. निंबळक ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदैव प्रयत्नशील. सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या सहकार्याने गावामध्ये घेतलेले विविध ऐतिहासिक निर्णय, ठराव तालुक्याला आदर्श असे ठरलेले आहेत. वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, पाणी प्रश्न, विधवांना सन्मान, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन, कोरोना काळात केलेले कार्य या सर्वांची दखल घेऊन त्यांना आंतरराज्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

      राष्ट्रीय ग्रामीण विकास फाउंडेशन, बेळगाव यांच्या वतीने देण्यात येणारा आंतरराज्य गौरव पुरस्कार मिळविणाऱ्या सौ. प्रियंका लामखडे या तालुक्यातील पहिल्याच सरपंच ठरलेल्या आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य व ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

____________________________________

 प्रियंका लामखडे यांचे कार्य आदर्शवत

 निंबळक गावच्या सरपंच पदाची धुरा सौ. प्रियंका अजय लामखडे या यशस्वीपणे सांभाळत आहे. त्यांच्या कल्पक नेतृत्वातून गावचा कायापालट होत आहे. त्यांच्या कार्यकाळात घेण्यात आलेले निर्णय हे ऐतिहासिक ठरलेले आहेत. इतर गावांनी निश्चितच आदर्श घ्यावा असे निर्णय निंबळक गावामध्ये घेण्यात आलेले आहेत.

 .......आमदार निलेश लंके 

___________________________

मला मिळालेला सन्मान हा माझा वैयक्तिक नसून संपूर्ण निंबळक गावाचा आहे. गाव विकासाचा निर्णय घेताना सर्व ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, ग्रामस्थ यांचे बहुमोल सहकार्य मिळत आहे. त्यामुळेच गाव विकासाबाबत निर्णय घेताना अडचण येत नाही.

..... सौ प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)

_______________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post