गॅस पाईपलाईन च्या कामामुळे आणखी एक बळी शेंडी शिवारात अपघातात मुलगा ठार तर आई गंभीर जखमी

माय अहमदनगर वेब टीम 


नगर तालुका- नगर औरंगाबाद महामार्गावर शेंडी शिवारात कंटेनरच्या झालेल्या अपघातात मुलगा जागीच ठार झाला तर आई गंभीर जखमी झाली आहे. गॅस पाईपलाईनच्या कामामुळे आणखी एक बळी गेल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली असून नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

      शेंडी शिवारातील वांबोरी फाटा नजीक गॅस पाईपलाईनचे पाईप घेऊन जाणा-या कंटेनरच्या (क्र. एम. एच. ०६ एक.क्यु. ६६२७) अपघातात बाबासाहेब काशिनाथ टेकाळे ( वय ४० रा. बीड) याचा जागीच मृत्यू झाला तर आई झुंबराबाई काशिनाथ टेकाळे (वय ६५) ही गंभीर जखमी झाली आहे.

     पिंपळगाव माळवी येथील मेहेर बाबाच्या दवाखान्यांमध्ये हे मायलेक गेले होते. तेथून परतत असताना उभ्या असलेल्या कंटेनरच्या सावलीला हे माय लेक बसले असता वाहनचालकाने वाहन सुरू करून पुढे घेतल्याने मुलगा कंटेनर च्या टायरखाली सापडुन त्याचा जागीच मृत्यू झाला तर आई झुंबराबाई हिच्या पायावरुन कंटेनर गेल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. घटनास्थळी एमआयडीसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल मोहम्मद शेख यांनी जखमीला रुग्णालयात पाठवुन वाहतुक सुरळीत केली.

     नगर-औरंगाबाद महामार्गावर सुरू असलेल्या गॅस पाइपलाइनच्या कामामुळे शेतकरी, व्यावसायिक यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे अपघातात अनेक जणांचे बळी गेले असून देखील प्रशासन कारवाई करत नाही. यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. आज झालेल्या अपघाताबद्दल संबंधित ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

     यापूर्वीदेखील गॅस पाईपलाईन च्या सावळ्या गोंधळामुळे अनेक अपघात होऊन काहींना आपले प्राण गमवावे लागले तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे. तरीदेखील प्रशासनाकडून त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने गॅस पाईपलाईनच्या  संबंधित ठेकेदार तात्काळ कारवाई करण्याची मागणी जेऊर पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

________________________________________________

आणखी किती बळी हवे आहेत 

नगर-औरंगाबाद महामार्गावर गॅस पाईपलाईनचे काम नियोजनशून्य पद्धतीने सुरू आहे. शेतकरी व्यवसायिक यांचे तर प्रचंड प्रमाणात नुकसान करण्यात आले आहे. त्यांच्या सावळ्या गोंधळामुळे अपघातात अनेक जणांचे बळी गेले आहेत. जेऊर पंचक्रोशीतील शेतकरी तसेच सरपंचांनी गॅस पाईपलाईन च्या संबंधित ठेकेदार विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची वारंवार मागणी केलेली आहे. परंतु संबंधित ठेकेदारावर कारवाई होत नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदार व प्रशासकीय अधिकारी यांचे आर्थिक साटेलोटे असल्याचा आरोप नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. प्रशासनाला आणखी किती बळी हवे आहेत असा संतप्त सवाल नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

____________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post