नाराजीनाट्याला कलाटनी! एकनाथ शिंदेंना शिवसेनेने दिली मोठी ऑफर

 


माय अहमदनगर वेब टीम 

मुंबई-  एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर राज्यात निर्माण झालेल्या राजकीय वावटळीचा पुढचा अंक सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून भावनिक शब्दांत व्यथा मांडली असताना दुसरीकडे आता त्यांनी एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी नाट्याला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची अट एकनाथ शिंदेंनी घातल्यानंतर आज खुद्द उद्धव ठाकरेंनीच फेसबुक लाईव्हमध्ये देखील शिवसैनिकच मुख्यमंत्री झाला तर आनंदच आहे, अशी भूमिका मांडली आहे.


एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडी सरकार दोलायमान अवस्थेत आल्याचं चित्र निर्माण झालं आहे. एकीकडे एकनाथ शिंदेंनी आपल्याला ४६ आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितल्यामुळे उद्धव ठाकरे सरकार अल्पमतात आल्याचं सांगितलं जात असताना दुसरीकडे भाजपाकडून यावर सावध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. गटनेते पदावरून देखील एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यामध्ये वाद झाल्यानंतर शिंदे शिवसेनेतून बाहेर पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना दिलेल्या ऑफरमुळे गणितं बदलण्याची शक्यता आहे.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना थेट राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. आज संध्याकाळी फेसबुक लाईव्हमध्ये देखील उद्धव ठाकरेंनी “माझ्याऐवजी दुसरा कुणी शिवसैनिक मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंदच आहे”, असं म्हटल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.


दरम्यान, आज फेसबुक लाईव्हमध्ये एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भावनिक शब्दांमध्ये भूमिका मांडली. “समोर बसा. मी आज माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार ठेवतो आहे. हा कुठेही लाचारीचा प्रसंग नाही. मजबुरी अजिबात नाही. काय होईल जास्तीत जास्त? परत लढू. जोपर्यंत माझ्यासोबतच शिवसैनिक आहेत, तोपर्यंत मी कोणत्याही संकटाला भीत नाही. मी आज शिवसैनिकांनाही आवाहन करतोय. ही शिवसेना बाळासाहेबांची शिवसेना राहिली नाही असं जे म्हणतात त्यालाही माझ्याकडे उत्तर आहे. जर शिवसेनेच्या कार्यकर्त्याला वाटत असेल की मी शिवसेना प्रमुख पद सांभाळायला नालायक आहे, तर मी शिवसेना प्रमुखपदही सोडेन. पण समोर येऊन सांगायला हवं. मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना प्रमुखपद सोडेन. मी मुख्यमंत्रीपद सोडून पुन्हा शिवसेनेचाच मुख्यमंत्री होत असेल, तर मला आनंद आहे. पण एकदा मला समोर येऊन सांगा. समोर या, आणि सांगा”, असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post