नगर तालुक्यात पहिला उपक्रम राबविणारे निंबळक गाव 'हर घर जल हर घर पेड' ; विधवांचा होणार सन्मान ; ग्रामसभेत ठराव

माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका(शशिकांत पवार)


-- नगर तालुक्यातील निंबळक गावची ग्रामसभा शनिवार दि. २८ रोजी खेळीमेळीत संपन्न झाली. जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच सौ. प्रियंका लामखडे, उपसरपंच बाळासाहेब कोतकर, ग्रामविकास अधिकारी सविता लांडे, सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामसभा संपन्न झाली.

     ग्रामसभेमध्ये 'हर घर जल हर घर पेड' या नवीन उपक्रमाचा ठराव संमत करण्यात आला आहे. प्रत्येक घरी पाणी त्याचप्रमाणे आता प्रत्येक घरी झाड लावण्याचा ठराव ग्रामसभेत घेण्यात आला आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करण्यात येणार असून शेजारी राहणाऱ्या नागरिकांना ते वृक्ष दत्तक देण्यात येणार आहेत. दत्तक देण्यात आलेल्या वृक्षांवर संबंधित कुटुंबाचे नाव टाकण्यात येणार असुन त्यांनी त्या वृक्षाचे जतन व संवर्धन करावयाचे आहे.

      तसेच यावेळी विविध विकास कामे व प्रस्तावित विकास कामांबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली. कोरोनानंतर प्रथमच झालेल्या ग्रामसभेला ग्रामस्थही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी खेळीमेळीच्या वातावरणात विविध विकासात्मक ठराव मंजूर करण्यात आले. गावातील सार्वजनिक ठिकाणचे अतिक्रमण स्वयंस्फूर्तीने काढून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अतिक्रमण काढले नाही तर शासनाच्या नियमाप्रमाणे अतिक्रमण काढण्याचा निर्णय घेण्यात आला.

     जल जीवन मिशन मध्ये सहभागी होऊन पाण्याचे नियोजन करण्याचे ठरले आहे. घरपट्टी, पाणीपट्टी वसुली, सुधारित दराने कर आकारणी, आमदार निलेश लंके तसेच जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे यांच्या निधीतून झालेली विकास कामे, सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबविणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.

    विधवा महिलांचा मानसन्मान अबाधित राहण्यासाठी अनिष्ट प्रथा बंद करून त्यांना समाजात मान प्राप्त करून देण्याचा महत्त्वपूर्ण ठराव ग्रामपंचायत मध्ये घेण्यात आला आहे. यावेळी ग्रामस्थांच्या समस्यांचे निराकरण जिल्हा परिषद सदस्य माधवराव लामखडे व सरपंच सौ. प्रियंका लामखडे यांनी केले.' हर घर जल हर घर पेड' तसेच विधवांना मानसन्मान हे ठराव घेण्याचा सर्वप्रथम मान नगर तालुक्यातील निंबळक  गावाने मिळवला आहे. ग्रामसभेसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

_____________________________________________

  तालुक्यातील एकमेव गाव निंबळक 

निंबळक गावामध्ये हर घर जल प्रमाणे हर घर पेड हा ठराव संमत करण्यात आला आहे. तसेच विधवा महिलां बद्दल असलेल्या अनिष्ट प्रथा बंद करून त्यांना मानसन्मान देण्याबाबत ठराव मंजूर करण्यात आला आहे. नगर तालुक्यात असे दोन्ही ठराव करणारे निंबळक हे एकमेव गाव ठरले आहे.

__________________________

 इतिहासात प्रथमच महिलांची ग्रामसभा

 निंबळक गावच्या इतिहासात प्रथमच शुक्रवार दि. २७ रोजी महिलांची ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. निंबळक गावात सरपंच, ग्रामविकास अधिकारी, तलाठी, आरोग्य अधिकारी ही गाव विकासाची सर्व महत्वाची पदे महिलाच सांभाळत आहेत. 'महिलाराज' असलेल्या निंबळक गावच्या इतिहासात प्रथमच महिला ग्रामसभा मोठ्या खेळीमेळीत संपन्न झाली.

_________________________________

 यांच्यासाठी पहिलीच ग्रामसभा

 कोरोनाच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर निंबळक गावात प्रथमच ग्रामसभा पार पडली. तसेच निंबळक गावच्या सरपंच सौ. प्रियंका लामखडे व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य त्याचप्रमाणे ग्रामविकास अधिकारी सौ. सविता लांडे यांनी निंबळक गावचा पदभार स्वीकारल्यापासून त्यांच्यासाठी ही पहिलीच ग्रामसभा होती.

________________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post