जेऊर पोलीस दूरक्षेत्र जागेचा प्रश्न मार्गी लागणार ?

 

माय अहमदनगर वेब टीम

नामदार तनपुरे यांचे आश्वासन ; १५ गावांना होणार फायदा

नगर तालुका-- नगर तालुक्यातील जेऊर पोलिस दूर क्षेत्राच्या जागेचा प्रश्न मार्गी लागणार असून त्याबाबत ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आश्वासन दिले आहे. अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते किशोर शिकारे यांनी दिली.

      याबाबत सविस्तर माहिती अशी की, एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन अंतर्गत जेऊर पोलीस दूरक्षेत्र आहे. पूर्वी जेऊर दूरक्षेत्राचा कारभार ग्रामपंचायतच्या छोट्याशा खोलीतून चालत होता. परंतु तेथे अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसल्याने तसेच ती जागा मोडकळीस आली आहे. त्यानंतर काही दिवसांपासून पोलीस दूरक्षेत्राचा कारभार टोलनाक्यावरील एका खोलीतून सुरू आहे. परंतु टोलनाक्याची मुदत देखील संपल्याने पोलिस दूर क्षेत्रासाठी जागाच नाही. जागेअभावी पोलीसांची परवड सुरू आहे.

      याबाबत धनगरवाडी येथील किशोर शिकारे यांनी ना. तनपुरे यांना परिस्थितीची माहिती दिली. धनगरवाडी शिवारात महामार्गालगत सरकारी जागा आहे. सदर जागेची मोजणी करून धनगरवाडी ग्रामपंचायत मध्ये ठराव घेण्यात येणार आहे. त्या जागेवर पोलिस दूरक्षेत्र बांधण्यासाठी निधी देण्यात येईल असे आश्वासन तनपुरे यांनी दिले आहे.

     जेऊर पोलीस दूरक्षेत्र परिसरातील सुमारे १० ते १५ गावांना फायदेशीर ठरणार आहे. तसेच महामार्गावर होणारे अपघात, रस्ता लूट व इतर गुन्हे कमी होण्यासाठी येथे दूरक्षेत्र होणे गरजेचे आहे. ना. तनपुरे यांनी आश्वासन दिल्याने पोलीस दूर क्षेत्राच्या जागेचा व निधीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे जेऊर पंचक्रोशीतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

_______________________________

 पोलीस दूरक्षेत्र मंजूर पण जागा नाही

 एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशन अंतर्गत जेऊर येथे पोलीस दूरक्षेत्र मंजूर आहे. परंतु जागेअभावी पोलीस दूरक्षेत्राचे काम रखडलेले आहे. अनेक गावांनी पोलीस दूरक्षेत्र मंजूर करण्यासाठी ग्रामस्थ मागणी, आंदोलन करत आहेत. परंतु जेऊर गावात पोलिस दूरक्षेत्र मंजूर असूनही जागेअभावी पोलीस दूरक्षेत्राचे काम रखडले आहे. तरी पोलीस दुरक्षेत्राला जागा मिळण्यासाठी परिसरातील गावांनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

_____________________________


गुन्हेगारीवर आळा बसणार

 पोलीस दूरक्षेत्र जेऊर येथे झाल्यास मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वर आळा बसणार आहे. रस्ता लूट, चोरी,  अपघात याकामी पोलीस दूर क्षेत्राची मोठी मदत होणार आहे. त्यासाठी जेऊर परिसरात महामार्गालगत सुसज्ज असे पोलीस दूरक्षेत्र होणे गरजेचे आहे.

...... किशोर शिकारे

---------------------------------------------

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post