माय अहमदनगर वेब टीम
नगर तालुका-- ग्रामसेवक पद हे ग्रामविकासाचा कणा असल्याचे प्रतिपादन जेऊर गावचे माजी सरपंच विकास कोथिंबीर यांनी व्यक्त केले.
जेऊर सोसायटीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्कार सौ. सविता लांडे यांना मिळाल्याबद्दल त्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी बोलताना माजी सरपंच तथा सोसायटी सदस्य विकास कोथिंबिरे यांनी सांगितले की, ग्रामसेवक हे पद म्हणजे गाव विकासाचा कणा असतो. ग्रामसेवकावर गाव विकासाची महत्त्वाची जबाबदारी असते. ग्रामसेवक सक्षम, निर्णयक्षम असेल तर गावचा विकास निश्चित होतो.
परंतु गावातील कुरघोडीच्या राजकारणात ग्रामसेवकांचा हकनाक बळी जात असल्याची खंतही कोथिंबीरे यांनी व्यक्त केली. अंतर्गत राजकारणात पदाधिकाऱ्यांना सोडून ग्रामसेवकास वेठीस धरण्याची त्यांच्याविरोधात वरिष्ठांकडे तक्रार अर्ज करण्याचे प्रमाण वाढले आहे. काही व्यक्ती तर वैयक्तिक स्वार्थापोटी असे उद्योग करत असतात.
सौ. सविता लांडे यांनी पेंडशेत या दुर्गम गावात तसेच दुष्काळी पट्ट्यातील धनगरवाडी व जेऊर गावात आदर्श असे काम केले आहे. त्यामुळे सुमारे ९५० प्रस्तावामधून सौ. सविता लांडे यांची पाच आदर्श ग्रामसेवकांमध्ये निवड झाली आहे. जेऊर गावात ग्रामविकास अधिकारी म्हणून सौ. सविता लांडे यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद तसेच उल्लेखनीय असे राहिलेले आहेत. कोरोना काळात घेतलेले निर्णय, अनेक वर्षे रेंगाळलेले व्यापारी संकुलाचा प्रश्न, आदिवासी विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच गाव विकासासाठी घेतलेले अनेक निर्णय आजही गाव हितासाठी उपयुक्त ठरत आहेत.
गावातील सर्व पदाधिकारी व नागरिकांनी साथ दिली तरच ग्रामसेवक गाव विकासाबाबत ठाम निर्णय घेऊ शकतात. गाव विकासासाठी राजकारण विरहित ग्रामसेवकांना सहकार्य करणे सर्व पदाधिकारी व नागरिकांचे कर्तव्य आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी ग्रामसेवकांची बदनामी करण्याचे प्रकार देखील वाढल्याचे विकास कोथिंबीरे यांनी सांगितले.
यावेळी सोसायटी चेअरमन मधुकर मगर, व्हाईस चेअरमन सोमनाथ तोडमल, सुनिल पवार, उपसरपंच श्रीतेश पवार, अविनाश तोडमल, राजेंद्र तोडमल सर्व सोसायटी सदस्य व ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------------------------------------
सविता लांडे यांचे कार्य कौतुकास्पद
ग्रामविकास अधिकारी सौ. सविता लांडे यांचे जेऊर, धनगरवाडी येथील कार्य कौतुकास्पद राहिलेले आहे. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय गाव विकासासाठी साठी उपयुक्त असे ठरलेले आहेत. त्यांचा गाव विकासाचा अभ्यास व त्यांनी राबविलेले विविध उपक्रम यामुळे धनगरवाडी गावाला दोन पुरस्कार तर पेंडशेत गावाला निर्मलग्राम आदर्श पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळे त्यांची आदर्श ग्रामसेवक म्हणून निवड झाली ती योग्यच आहे.
.... सोमनाथ तोडमल ( व्हाइस चेअरमन)
______________________________
Post a Comment