सविता लांडे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेविका पुरस्कार प्रदान

माय अहमदनगर वेब टीम

नगर तालुका- नगर तालुक्यातील निंबळक गावात ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ. सविता लांडे गेल्या १८ वर्षांच्या कालावधीत विविध गावांमध्ये राबविलेल्या उपक्रमांची दखल घेत सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांनी त्यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेविका पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. राज्यभरातील ५ ग्रामसेवकांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले  असून त्यात सौ.लांडे यांचा समावेश आहे.

सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, प्रदेश सरचिटणीस ॲड. विकास जाधव, नगर जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे आदींनी या पुरस्कारांची घोषणा केली होती. ग्रामविकासाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदर्श गाव हिवरे बाजार येथे पद्मश्री पोपटराव पवार, आमदार प्रशांत बंब, विधान परिषद सदस्य सुरेश धस, आमदार निलेश लंके, अंमलबजावणी संचालनालय मुंबई चे सहआयुक्त उज्वल कुमार चव्हाण, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सोलापूर श्रीमती चंचल पाटील, युवा उद्योजक अजय लामखडे, जेऊर सरपंच सौ. राजश्री मगर, उपसरपंच श्रीतेश पवार, ग्रामपंचायत सदस्य निता बनकर, अण्णासाहेब मगर, आप्पा बनकर, बाबासाहेब तोडमल यांच्या सह मान्यवरांच्या हस्ते सविता लांडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

      निंबळक गावात ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ. सविता लांडे गेल्या १८ वर्षांपासून ग्रामीण भागाच्या विकासात योगदान देत आहेत. पुण्यासारख्या शहरात जन्म झाल्यानंतर संपूर्ण शिक्षण पुण्यामध्येच घेतले. त्यानंतर ग्रामसेवक म्हणून नियुक्ती झाली ती थेट अतिदुर्गम आदिवासी भागात असलेले अकोले तालुक्यातील पेंडशेत गावात. आदिवासी भागात पाच वर्ष ग्रामसेवक म्हणून सेवा देताना सौ. सविता लांडे यांनी आपल्या कार्यातून वेगळाच ठसा निर्माण केला. त्यांच्या कार्याची पद्धत, निर्णयक्षमता, नाविन्यपूर्ण उपक्रमांची संपूर्ण तालुक्यात चर्चा झाली. 

     पेंडशेत या अतिदुर्गम भागात निर्मल ग्राम योजना राबविण्यात सौ. सविता लांडे यशस्वी ठरल्या. निर्मल ग्राम पुरस्कार पेंडशेत गावाला मिळवून दिला. अतिशय दुर्गम भागातुन त्यांची बदली झाली ती दुष्काळी पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नगर तालुक्यात. नगर तालुक्यातील धनगरवाडी या गावचा पदभार स्वीकारला आणि गावात विकासाची गंगा सुरू झाली. सौ लांडे यांनी धनगरवाडी येथे विविध नवीन उपक्रम राबविले. त्यामुळे राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पर्यावरण विकासरत्न पुरस्कार धनगरवाडी गावाला प्राप्त झाला तसेच संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार देखील धनगरवाडी गावाला मिळवून देण्यात सौ. लांडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.जेऊर गावात सुमारे सात ते आठ वर्ष ग्रामविकास अधिकारी म्हणून लांडे यांनी जबाबदारी पार पाडली.

     नगर तालुक्यातील निंबळक गावचा ग्रामविकास अधिकारी म्हणून सौ. सविता लांडे यांनी पदभार स्वीकारला आहे. चार महिन्यातच सरपंच सौ. प्रियंका लामखडे व ग्रामपंचायत सदस्यांना सोबत घेत नवनवीन उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या या कामांची दखल राज्य पातळीवर काम करणाऱ्या सरपंच परिषद मुंबई, महाराष्ट्र यांनी घेतली असून त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

_______________________________________

जेऊर, धनगरवाडी ग्रामस्थांकडून अभिनंदन

ग्राम विकास अधिकारी सौ. सविता लांडे यांना राज्यस्तरीय आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी यापूर्वी जेऊर, धनगरवाडी येथे ग्रामविकास अधिकारी म्हणून उत्तम रित्या सेवा बजावली होती. त्यामुळे जेऊर व धनगरवाडी ग्रामस्थांकडून सौ. लांडे यांचे अभिनंदन करण्यात आले.

____________________

जेऊर मध्ये आनंदोत्सव

ग्राम विकास अधिकारी सौ.सविता लांडे यांना आदर्श राज्यस्तरीय ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त झाल्याने जेऊर मध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. जेऊर, धनगरवाडी येथे ग्राम विकास अधिकारी म्हणून सौ. सविता लांडे यांच्याकडे यापूर्वी पदभार होता. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आजही गावहिताचे ठरत आहेत. त्यामुळे जेऊर तसेच धनगरवाडी ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी जेऊर गावच्या सरपंच सौ. राजश्री मगर, ग्रामपंचायत सदस्य निता बनकर, उपसरपंच श्रीतेश पवार, ग्रामपंचायत सदस्य गणेश पवार, अण्णासाहेब मगर, आप्पा बनकर, बाबासाहेब तोडमल उपस्थित होते.

_______________________________


ग्रामविकास अधिकारी म्हणून सौ. सविता लांडे यांनी निंबळक गावचा पदभार स्वीकारून चार महिने झाले नाही तोच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची झलक निंबळक ग्रामस्थांना अनुभवायास आली आहे. त्यांची कार्य करण्याची पद्धत व निर्णय क्षमता तसेच ग्राम हिताचे घेण्यात येत असलेले निर्णय उल्लेखनीय असे आहेत. सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांना विश्वासात घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत गाव हितासाठी फायद्याची ठरत आहे. निंबळक ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे हार्दिक अभिनंदन.

......सौ.प्रियंका अजय लामखडे (सरपंच, निंबळक)

_______________________

जेऊर गावामध्ये अनेक वर्षापासून रेंगाळलेला व्यापारी संकुलाचा प्रश्न ग्राम विकास अधिकारी म्हणून सौ. सविता लांडे यांच्या काळात मार्गी लागला.तसेच जेऊर गावच्या विकासासाठी अनेक निर्णय त्यांच्या काळात घेण्यात आले. ग्रामपंचायत कार्यालयाचे नूतनीकरण, कोरोना काळात ग्राम विकास अधिकारी म्हणून त्यांनी घेतलेले निर्णय गावासाठी खूपच फायदेशीर ठरले होते.
........ श्रीतेश पवार (उपसरपंच जेऊर)
-------------------------------------------------------

सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या वतीने सौ सविता लांडे यांना आदर्श ग्राम विकास अधिकारी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सौ. सविता लांडे यांच्या कार्याची दखल सरपंच परिषदेकडून घेण्यात आली त्यांनी धनगरवाडी गावाला दोन पुरस्कार मिळवून दिले आहेत. त्यांच्या कार्याची पद्धत ,निर्णय क्षमता अन गाव विकासासाठी त्या नेहमीच अग्रेसर असतात. आदर्श ग्रामसेवक म्हणून त्यांची झालेली निवडी योग्यच असल्याचे धनगरवाडी सरपंच शुभांगी शिकारे, ग्रामपंचायत सदस्य विष्णू आढाव, अशोक वीरकर यांनी सांगितले.
___________________________________

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post