विराटने वनडेतून ब्रेकची विनंती केली नाही; बीसीसीआयची स्पष्टाेक्ती

 


भारतीय संघाचा कसोटी कर्णधार विराट कोहली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती घेणार असल्याची चर्चा होती. मात्र, बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी म्हटले, माजी एकदिवसीय आणि टी-२० कर्णधार कोहलीने आतापर्यंत मंडळाकडे अशी कोणतीही अधिकृत विनंती केलेली नाही. भारतीय संघ २६ डिसेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना खेळणार आहे. अंतिम कसोटी ११ ते १५ जानेवारीदरम्यान खेळवली जाणार आहे. एकदिवसीय मालिका १९ जानेवारीपासून सुरू होणार आहे. मंडळाच्या अधिकाऱ्याने म्हटले की, ‘आतापर्यंत कोहलीने बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली किंवा सचिव जय शहा यांना वनडे सामन्यांमधून विश्रांती घेण्याची विनंती केली नाही.’ कसोटी मालिकेसाठी खेळाडू गुरुवारी खासगी विमानाने द. आफ्रिकेला जातील.


अधिकाऱ्यांनी म्हटले की, खेळाडूंसोबत त्यांचे कुटुंबीयदेखील जाणार आहे. विराटदेखील आपल्या कुटुंबासह जाईल. अधिकाऱ्याने मान्य केले की, जर विराटला कसोटी मालिकेनंतर जैवसुरक्षित वातावरणातून विश्रांती घ्यायची असेल तर तो निश्चितपणे मुख्य निवडकर्ता आणि सचिवांना कळवेल. आफ्रिकेत पोहोचल्यानंतर खेळाडूंना केवळ एक दिवस क्वाॅरंटाइन : भारतीय खेळाडू द. आफ्रिकेत पोहोचल्यानंतर केवळ एक दिवस क्वाॅरंटाइनमध्ये राहतील. त्याच दिवशी त्यांची तीन वेळा कोरोना चाचणी केली जाईल. तिन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सेंच्युरिअन हॉटेलमध्ये प्रवेश दिला जाईल. खेळाडू संपूर्ण दौऱ्यादरम्यान जैवसुरक्षित वातावरणात राहतील. १९ डिसेंबरला संघाला सराव करण्याची परवानगी मिळेल.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post