जिल्हा रूग्णालयाला आग तांत्रिक कारणामुळे?



 अहमदनगर | जिल्हा रुग्णालयातील आगीमागे ‘तांत्रिक’ दोष असल्याची माहिती सूत्रांनी दिली. राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षकांच्या पथकाने सोमवारी जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीच्या ठिकाणी पाहणी केली होती. यानंतर त्यांनी समितीकडे प्राथमिक अहवाल दिला असून आग ‘तांत्रिक’ कारणाने लागली असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून 11 करोना रुग्णांचा मृत्यू झाला. याप्रकरणाची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी सुरू झाली आहे. अतिदक्षता विभागाला आग कुठून आणि कशामुळे लागली याचा शोध घेणे महत्त्वाचे असल्याने सोमवारी राज्याचे मुख्य विद्युत निरीक्षक यांनी पथकासह भेट देऊन पाहणी केली. त्यांच्या पथकाने अतिदक्षता विभागाची बारकाईने पाहणी करून नोंदी घेतल्या होत्या. यावेळी पोलीस पथक त्यांच्यासोबत होते.

करोनाच्या काळात या नवीन इमारतीचा वापर सुरू झाला होता. याच दरम्यान विद्युत यंत्रणेतील दोष व त्रुटींबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रुग्णाालयाला पत्र देण्यात आले होते. ते पत्र यानिमित्ताने चर्चेत आले आहे. पोलिसांकडे हे पत्र उपलब्ध झाले असल्याची माहिती आहे. या पत्रात सदोष व्यवस्थेमुळे आगीची घटना घडू शकते, अशी शक्यताही व्यक्त करण्यात आली होती. यामुळेच राज्य सरकारचे विद्युत निरीक्षक यांनी रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. आगीमागे तांत्रिक कारण असल्याची शक्यता आहे.

सदर दुर्घटना तांत्रिक बाबीमुळे झाल्याचे मुख्य निरीक्षकांच्या पथकाच्या अहवालात आहे. दरम्यान, याबाबत विभागीय आयुक्त तथा चौकशी समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण गमे यांना विचारणा केली असता, प्राथमिक स्वरूपात अहवाल प्राप्त झाला असून त्यावर समिती अभ्यास करत आहे. आणखी काही माहिती लागणार आहे, तसे संबंधितांना सांगितले आहे. अंतिम अहवाल सोमवारपर्यंत येणे अपेक्षित असल्याचे आयुक्त गमे यांनी सांगितले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post