“मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पांडुरंगाच्या दर्शनाचा अधिकार नाही”

माय वेब टीम 

 पुणे | कोरोनाच्या वाढत्या धोक्यामुळे आषाढी एकादशीच्या यात्रेवर सरकारने कडक निर्बंध लावले आहेत. कोरोनामुळे यंदाही वारीसाठी केवळ 10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. सरकारच्या या निर्बंधामुळे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपच्या आध्यात्मिक आघाडीने पायी वारी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता विश्व हिंदू परिषदेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

महाराष्ट्राच्या संत परंपरेवर गेली दोन वर्षे सातत्याने अन्याय होत आहे. दोन महिन्यांपासून पायी वारीची मागणी करणाऱ्या वारकऱ्यांना सरकारकडून दुष्टपणाची वागणूक दिली जात असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र क्षेत्रमंत्री शंकर गायकर यांनी केला आहे. सरकारच्या या वागणूकीमुळे मुख्यमंत्र्यांना पंढरपूर येथे पांडुरंगाचे दर्शन घेण्याचा अधिकार नाही, अशी टीका शंकर गायकर यांनी केली आहे.

वारकऱ्यांनी नेहमीच सरकारला साथ दिली. कोरोनाकाळात आश्रम उघडी केली, हजारो नागरिकांना भोजन व्यवस्था उपलब्ध केली. मात्र, सरकार सातत्याने वारकऱ्यांना हीन वागणूक देत आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी बंदी घालणाऱ्या सरकारलाच लस देण्याची गरज निर्माण झाली आहे, अशी टीका देखील त्यांनी केली आहे.

दरम्यान, वारीला पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही. पालखी पायी गेल्यास लोक उत्साहाच्या भरात पालखीभोवती गर्दी करतील. त्यामुळे कोरोना नियमांचा भंग होऊ शकतो. कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. त्यामुळेच पायी जाण्यास परवानगी देण्यात आली नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं आहे.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post