ठाकरे-मोदी भेटीतून मराठा आरक्षणावर नक्कीच तोडगा निघेल


 

नवी दिल्ली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. मराठा आरक्षणावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होणार आहे. या बैठकीतून मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल, असा विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा विश्वास व्यक्त केला. मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रात मोर्चे निघत आहेत. आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यावर गंभीरपणे विचार करत आहेत. मराठा आरक्षणावर काळजीपूर्वक काम करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मोदींना भेटत आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आहेत. या भेटीतून मराठा आरक्षणावर तोडगा निघेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.

आरक्षणाचा मुद्दा अधिक काळ ताणला जाऊ नये

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री ठाकरे यांची काल भेट झाली. या भेटीत मराठा आरक्षणावर चर्चा झाली. मराठा आरक्षणाचा मुद्दा अधिक काळ ताणला जाऊ नये असं महाराष्ट्रातील प्रत्येक नेत्याला वाटतं आहे. त्या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरे यांची भेट झाली, असं त्यांनी सांगितलं.

आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या कोर्टात

ओबीसी आणि मराठा नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्राचं वातावरण गढूळ होईल, तणाव निर्माण होईल, अशी परिस्थिती आहे. कोर्टाच्या आदेशानंतर मराठा आरक्षणाचा चेंडू केंद्राच्या अख्त्यारीत गेला आहे. त्यामुळे केंद्राच्या दरबारात हा विषय मांडणं हे मुख्यमंत्र्यांचं कर्तव्य आहे, असंही ते म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post