विजेचा शॉक देऊन भावाच्या मदतीने पत्नीनेच केला पतीचा खून


 माय वेब टीम 

कोपरगाव - भावाच्या मदतीने पत्नीनेच पतीला विजेच्या शॉक देऊन व दोरीने गळा आवळून खून केल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आरोपी जयश्री संवत्सरकर व तिचा भाऊ किरण ढोणे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करून कोपरगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी डोईफोडे यांच्या समोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलिसांची कोठडी सुनावली आहे .

आरोपी जयश्री संवत्सरकर व मयत पती शिवनारायण नानाभाऊ संवत्सरकर यांच्यात दारू पिण्याच्या कारणावरून बेबनाव होता. मयत हा दारू पिऊन पत्नीला त्रास देण्याचे काम करत होता. त्यामुळे पत्नी त्रस्त झाली होती. तिने आधी याबाबत अनेकवेळा पतीला समजावून सांगितले होते. मात्र त्याने त्याकडे दुर्लक्ष करून आपला दारू पिऊन तिला चारित्र्याच्या संशयावरून त्रास देण्याचा उपद्रव सुरूच ठेवला होता. त्यानंतर पत्नीने पतीचा काटा काढण्याचे ठरवत हटूल येथील कारागृहात सेवेत असलेल्या भावाला बोलावून घेतले होते.

6 जून रोजी रात्रीच्या सुमारास पतीला आधी केबलच्या सहाय्याने विजेच्या शॉक दिला. शॉक ने काही अंशी मृर्च्छित झाल्यावर दोरीच्या साहाय्याने गळफास दिला. शहर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी दारूच्या नशेत मयताने विजेच्या शॉक घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव केला होता. मात्र पोलीस तपासात व मयताच्या वडिलांनी दिलेल्या जबाबात विसंगती आढळून आली होती त्या वरून तपासी अधिकार्‍यांनी तपास केला असता ही खुनाची बाब उघड झाली होती.

वैद्यकीय अधिकार्‍यांनी अहवालात मयताचा मृत्यू हा गळा आवळून झाला असल्याचा अभिप्राय दिला होता. याबाबत पोलिसांनी या बाबी निष्पन्न झाल्याने आरोपीना बेड्या ठोकल्या.त्यांना कोपरगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी श्री. डोईफोडे यांच्या समोर हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भरत नागरे करीत आहेत .

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post