खेळणी उद्योगामध्ये भारतीय संकल्पना गरजेची - पंतप्रधान; स्थानिक खेळण्यांचा बाजार वाढावा


माय वेब टीम 

नवी दिल्ली - देशात ८० टक्के खेळण्याच आयात केल्या जातात. खेळण्यांवरच देशातील कोट्यवधी रुपये बाहेर जात आहेत. हे चित्र बदलण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. गुरूवारी आयोजित टॉयकॅथॉन-२०२१ मध्ये ते मार्गदर्शन करत होते. ते म्हणाले, जगातील खेळण्याची बाजारपेठ सुमारे ७.४२ लाख कोटी रुपयांची आहे. त्यात भारताची भागीदारी केवळ ११ हजार १३५ कोटी रुपये आहे. या भागीदारीला वाढवण्याची गरज आहे. त्यासाठीच आता खेळण्या, खेळांचा विकास यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे.

भारतीय पैलूंना दर्शवणारी खेळणी विकसित केली पाहिजे. लहान मुलांची पहिली शाळा त्याचे कुटुंब असते. पहिला मित्र खेळणी असतो, असे मोदींनी सांगितले. टॉयकॅथॉनमध्ये सुमारे १ हजार ५६७ टीमचा सहभाग आहे. एवढ्या मोठ्या संख्येने टीम सहभागी होण्याचा अर्थ आत्मनिर्भर भारत कार्यक्रम बळकट होण्याचे हे संकेत आहेत. या दरम्यान स्पर्धकांनी पंतप्रधानांना आपापल्या गेम्सबद्दल माहिती दिली.

ऑनलाइन किंवा डिजिटल गेम्सची धारणा भारतीय नाही
ऑनलाईन व डिजिटल गेम्सच्या मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या गेम्समध्ये भारताचे दर्शन घडत नाही. अनेक गेम्सच्या संकल्पना हिंसाचाराला प्रोत्साहन देणाऱ्या आहेत. त्यातून मानसिक तणावात वाढ होते. म्हणूनच या प्लॅटफॉर्मवर पर्याय देण्यासाठी नव्या कल्पना आल्या पाहिजेत. त्यात भारतीय चिंतन असले पाहिजे. अशा प्रकारच्या खेळण्या विकसित करण्याकडे आपला विचार असला पाहिजे. त्यात भारतीय पैलू दिसावेत.

१७ हजारांहून जास्त संकल्पना मांडल्या
शिक्षण मंत्रालय, महिला व बाल कल्याण मंत्रालयाने संयुक्तपणे या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. त्याची सुरूवात ५ जानेवारी २०२१ रोजी झाली होती. तेव्हापासून देशातील १.२ लाख स्पर्धकांनी त्यासाठी नोंदणी केली. त्यात १७ हजारांहून जास्त नव्या संकल्पना मांडण्यात आल्या. त्यापैकी १ हजार ५६७ कल्पनांची निवड झाली. अशाच प्रकारचे आयोजन आता २२ ते २४ जून दरम्यान होणार आहे. भारतीय खेळणी उद्योगाला प्रोत्साहन देणे असा त्यामागील उद्देश आहे.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post