ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकेल का?, आदित्य ठाकरे म्हणाले…



माय वेब टीम
मुंबई - महाराष्ट्रामध्ये शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही अशी टीका सातत्याने राज्याची विरोधी पक्ष असणाऱ्या भाजपाकडून केली जातेय. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसत्ताच्या ‘दृष्टी’ आणि ‘कोन’ या दूरसंवाद मालिकेमध्येही हे सरकार स्वत:च्या वजनानेच पडेल अशी टीका केली होती. मात्र ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार नाही अशी टीका करणाऱ्यांना शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंनी उत्तर दिलं आहे.

आदित्य ठाकरेंनी एका मुलाखतीमध्ये राज्य सरकार टीकणार नाही अशी सातत्याने टीका करणाऱ्यांना टोला लगावला आहे. ठाकरे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करु शकेल का?, असा प्रश्न आदित्य यांना एबीपी न्यूजने घेतलेल्या मुलाखतीमध्ये विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तीन पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन केली ही चांगली गोष्ट असल्याचं आदित्य यांनी म्हटलं. हे तीन पक्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी आणि महाराष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी एकत्र आले आहेत, असंही आदित्य म्हणाले. महाविकास आघाडीमधील पक्षांमध्ये वाद असल्याचे दावे केले जात असल्यासंदर्भात बोलताना, “तुम्ही ज्याला वाद म्हणत आहात तो मला वाद वाटत नाही. तीन पक्षांचं सरकार आहे तर चर्चा होत राहतात. लोकशाहीमध्ये वेगवेगळ्या विचारसरणी एकत्र येतात आणि विश्लेषण करुन काम केलं तर अधिक चांगल्या पद्धतीने सेवा देता येते. असं झाल्यास केवळ पाच वर्षे नाही तर पुढेही आम्ही एकत्र राहून सेवा करत राहू,” असं आदित्य म्हणाले.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post