… धाडस असेल तर अधिवेशन घेऊन दाखवावं नंतर मी केंद्राचं पाहतो..


पुणे - 
“आपण जात कधी पाहिलेली नाही, पण आता तर लहानपणाचे मित्रदेखील अंतर ठेवून बोलतात. ही फळी कोण निर्माण करत आहे, तर ते राज्यकर्ते करत आहे. समाजाचा याच्याशी काही संबंध नाही. आरक्षण द्यायची इच्छाच नसून राजकारण करायचं आहे. व्यक्तीकेंद्रीत राजकारण सुरु असून उद्रेक झाला तर राज्यकर्ते जबाबदार असतील. त्यावेळी आम्हीदेखील थांबवू शकणार नाही. आम्ही आडवे आलो तर आमच्यावरही हल्ला करायला थांबणार नाहीत. अशी वेळ येऊ देऊ नका, पण ही वेळ येणार आहे,” अशी भीती उदयनराजेंनी व्यक्त केली आहे.

मराठा आरक्षणाबाबत आंदोलनाची हाक दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे यांनी आज उदयनराजेंची भेट घेतली. पुण्यात दोन्ही राजेंमध्ये मराठा आऱक्षणाच्या मुद्यावर चर्चा झाली.आम्ही दोघं एकाच घराण्यातील आहोत. दोन घराण्यांचा संबंध नाही. संभाजीराजे यांनी मांडलेल्या विचारांशी मी सहमत आहे,” असं उदयनराजे यांनी म्हटले आहे. याचबरोबर उद्या आमच्यावरही हल्ला होईल अशी वेळ येऊ शकते अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा
“मुद्द्यांवर आधारित राजकारण केलं तर लोक पाठिंबा देतील. मुद्दे घेतले जात नाहीत तर समाजाच्या आधारे राजकारण केलं जात आहे. कारण नसताना इतकी मोठी दुफळी निर्माण केली आहे. न्यायालयावर तर माझा विश्वासच नाही,” असं उदयनराजेंनी यावेळी सांगितलं. उदयनराजे यांनी यावेळी संभाजीराजेंनी पुकारलेल्या मूक आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं सांगितलं. त्यांनी काय करावं हा त्यांचा मुद्दा आहे, शेवटी मराठा आरक्षण हेच ध्येय आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.

“राज्यकर्त्यांना आतापर्यंत फार मुभा दिली आहे. निवडून आल्यानंतर लोकशाहीतील हे जे राजे आहेत त्यांनाही जाब विचारला पाहिजे. राजेशाही होती तेव्हा असं नव्हतं. लोकशाही अस्तित्वात आल्यानंतर ते राजे नीट वागत नसले तर त्यांना आडवा आणि गाढलं पाहिजे असं ठाम मत आहे. त्यांना जाब विचारा आणि त्याची सुरुवात माझ्यापासून करा. प्रत्येक आमदार, खासदाराला विचारलं पाहिजे. किती दिवस लोकांना संभ्रमावस्थेत ठेवणार आहात आणि हा अधिकार कोणी दिला,” असा संतापही उदयनराजेंनी व्यक्त केला.

भाजपा नेत्यांच्या टीकेसंबंधी विचारण्यात आलं असता उदयनराजेंनी म्हटलं की, “पाच बोटं जशी सारखी नसतात तसं प्रत्येकाचं वेगळं मत असतं. माझी मूल्यं वेगळी आहे. मी जमिनीवर परिस्थिती पाहून चालणार माणूस आहे. कायदा वैगेरे मी मानत नाही”. यावेळी त्यांनी सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी गायकवाड कमिशनचा अहवालच वाचलेला नाही, हा माझा आरोप नाही तर ठाम मत आहे असंही म्हटलं. 

दिशाभूल करणं आमच्या रक्तात नाही – संभाजीराजे
“दोन्ही छत्रपती घराण्यांचा फार मोठा सामाजिक वारसा आहे. समाजाला आम्ही नेहमी एक वेगळी दिशा दिली आहे. दिशाभालू करणं आमच्या रक्तात नाही. म्हणून आपण उदयनराजेंची भेटी घेतली. आमची सविस्तर चर्चा झाली असून बहुतांश अनेक विषयांवर आमचं एकमत आहे. आमच्यात अजिबात दुमत नाही. आम्ही पूर्वीपासून एकमतानं काम करत आलो आहोत,” असं संभाजीराजेंनी यावेळी सांगितलं.

“मी पाच मागण्या मांडल्या असून मंजूर केल्यास स्वागत करु शकतो. समाज बोलला आहे, लोक बोललेत आणि लोकप्रतिनिधींनी बोलणं गरजेचं आहे. अधिवेशनाच्या माध्यमातूनही हा प्रश्न मार्गी लागू शकतो,” असंही यावेळी त्यांनी सांगितलं. बऱ्याच वर्षानंतर सातारा आणि कोल्हापूर घराणं एकत्र झाल्याचा आनंद यावेळी त्यांनी व्यक्त केला. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज भेटीवर बोलताना ते म्हणाले की, “अजित पवार यांना आशीर्वाद घ्यायचा असेल. त्या भेटीत काय झालं याची माहिती नाही. ही भेट होणार आहे याची मला कल्पना नव्हती. काही सकारात्मक होत असेल तर स्वागतच आहे”


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post