'त्यांनी अमित शाह यांना शिवसेना संपविण्याची सुपारी दिलीय'



माय अहमदनगर वेब टीम

मुंबई -  केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. नारायण राणे यांच्या लाईफटाईम वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्धाटनासाठी अमित शाह आले होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर गंभीर आरोप केले. अमित शाह यांच्या आरोपांनंतर शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना भावनिक पत्र लिहिलं आहे.

पत्रामध्ये उद्धव ठाकरे यांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली आहे. गृहमंत्रीपदी असणाऱ्या अमित शाह यांनी नारायण राणेंच्या कार्यक्रमात शिवसेना संपविण्याचा केलेला उल्लेख केलेला ऐकून नारायण राणेंना सुद्धा हसू आवरलं नसेल. नारायण राणेंनी गेल्या १५ वर्षांपासून शिवसेना संपविण्याचा विडा उचलला होता. पण त्यांना जमलं नाही. म्हणून त्यांनी अमित शाह यांना बोलावून शिवसेना संपविण्याची सुपारी दिली, असं उद्धव ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे.


उद्धव ठाकरे यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला आहे. “गुजराती माणूस महाराष्ट्रात येऊन, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी जन्माला आलेल्या शिवसेनेला संपविण्याचे वाक्य बोलतो आणि नारायण राणेसकट कार्यक्रमाला उपस्थित संपूर्ण मराठी जण या वाक्याला टाळ्या वाजवण्यासारखं मराठी माणसाच दुसरं दुर्दैव नसेल,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली आहे.


अमित शाह काय म्हणाले-

“महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेला मुख्यमंत्रिपदाबाबत कोणतंही आश्वासन दिलं नव्हतं,” असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं. “भाजप-शिवसेना युतीला जनादेश दिला असताना शिवसेनेने तो नाकारत तीन चाकी सरकार निर्माण केले. मी बंद खोलीत नाही, तर जाहीररीत्या शब्द देतो,” असं सांगत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शिवसेनेला फटकारलं. “शिवसेनेच्या मार्गाने आम्ही चाललो असतो तर शिवसेनाच शिल्लक राहिली नसती,” असंही ते म्हणाले.


“जनादेशाचा अनादर करत सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेने तीन चाकी सरकार निर्माण केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर उद्धव ठाकरे यांनी मतं मागितली आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांच्या शिवसेनेला त्यांनी तिलांजली दिली आहे. या तीन चाकी सरकारची तीन दिशांना तोंडं आहेत,” अशी टीका त्यांनी केली.


शिवसेनेवर टीका करताना शाह म्हणाले, “आम्ही तुमच्या रस्त्यावर चालणार नाही, तुमच्या मार्गाने चाललो असतो तर सेना उरलीच नसती. आम्ही जनकल्याण, अंत्योदय, राष्ट्रभक्ती या मार्गाने चालणारे आहोत. महाराष्ट्रातील भाजपच्या कार्यकत्र्यांना सरकारने घाबरवण्याचा प्रयत्न केला तरी कार्यकर्ते घाबरणार नाहीत”.

0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post