शिर्डी साई मंदिरात ड्रेसकोड हवा की नको?; भक्तांनी दिला 'हा' कौल माय अहमदनगर वेब टीम

नगर : शिर्डी येथील श्री साईबाबा समाधी मंदिर प्रवेशद्वारांवर पोषाखाबाबत बोर्ड लावण्यात आला आहे. 'सभ्यीतापूर्ण पोषाख अथवा भारतीय संस्कृतीस अनुसरुन पोषाख परिधान करून मंदिरात दर्शनाकरिता यावे', असे आवाहन वजा विनंती या बोर्डद्वारे करण्यात आल्याचे शिर्डी संस्थानने स्पष्ट केले आहे. तसेच या आवाहनाला साईभक्तांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती संस्थानकडून देण्यात आली आहे. या बोर्डबाबत ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत १५ हजार ५०६ साईभक्तांनी आपल्या प्रतिसादात्मक प्रतिक्रिया नोंदविलेल्या आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त सभ्य पोषाखात नसतात, अशा तक्रारी काही भक्तांनी संस्थान प्रशासनाकडे केलेल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन शिर्डी संस्थान प्रशासनाकडून सभ्यतापूर्ण पोषाख परिधान करून मंदिरात दर्शनाकरीता यावे, असे आवाहन वजा विनंती करण्यात आली. तसे बोर्डही मंदिर प्रवेशद्वारांवर लावण्यात आलेले आहेत. या बोर्डच्या माध्यमातून संस्थानने भाविकांना कुठलीही सक्ती केली नसून हे फक्त आवाहन करण्यात आलेले आहे. मात्र यावरून वाद निर्माण होऊ लागला आहे.

भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर हा बोर्ड हटवा, अन्यथा आम्ही येऊन हटवू, असा इशाराच दिला आहे. त्यातच या बोर्ड बाबत साईभक्तांचे मत जाणून घेण्याकरीता संस्थानच्या वतीने दर्शन रांगेत अभिप्राय नोंदवही व फॉर्मची व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्यानुसार ३ डिसेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत दर्शनाकरिता आलेल्या सुमारे १५ हजार ५९९ साईभक्तांनी मंदिर प्रवेशद्वारांवर लावण्याात आलेल्या फलकांबाबत आपला अभिप्राय नोंदविलेला आहे. यामध्ये १५ हजार ५०६ साईभक्तांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नसून सदरचा निर्णय योग्यच आहे, असा अभिप्राय नोंदविलेला आहे. तर, ९३ साईभक्तांनी हा निर्णय अयोग्य असल्याबाबत अभिप्राय नोंदविला आहे. शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी ही माहिती दिली.


0/प्रतिक्रिया द्या

Previous Post Next Post